चिपळूण नगर पालिकेत अनेक प्रभागांत अटीतटीच्या लढती
- by Yogesh Bandagale
- December 23, 2025
- 200 views
चिपळूण : चिपळूण नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून शिवसेना–भाजप महायुतीचे उमेश सकपाळ हे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. या निवडणुकीत एकूण 28 जागांपैकी शिवसेनेला 9, भाजपला 7, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 5, काँग्रेसला 3, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांना प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत. अनेक प्रभागांत अत्यंत कमी मताधिक्यामुळे निकाल लागल्याने निवडणूक चुरशीची ठरली.
प्रभागनिहाय ठळक निकाल :
प्रभाग क्रमांक 3 मध्ये जावा-जावा लढतीत रूपाली राकेश दांडेकर यांनी 652 मते घेत स्वाती दांडेकर (467 मते) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती आशिष खातू यांना पराभव पत्करावा लागला, तर अजय भालेकर यांनी 369 मते मिळवत विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 5 मध्ये नसरीन खडस व रुई खेडेकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. येथे भाजपच्या रुई खेडेकर यांचा अवघ्या 5 मतांनी पराभव झाला.
प्रभाग क्रमांक 6 मध्ये संजय गोताड हेही केवळ 5 मतांनी विजयी झाले. येथे बरकत पाते (412 मते) व नियाज पाते (380 मते) या दोन मुस्लिम उमेदवारांमधील मतविभाजनाचा फायदा संजय गोताड यांना झाला असून ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळाली.
प्रभाग क्रमांक 4 (महिला) मध्ये वैशाली कदम यांनी सुरय्या फकीर यांचा 161 मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक 11 मध्ये नीलम जाधव यांनी समीक्षा जाणवलकर यांच्यावर अवघ्या 14 मतांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये विक्रांत उर्फ कपिल विठ्ठल शिर्के यांनी 892 मते घेत 639 मतांच्या मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 7 मध्ये संदीप भिसे व सुनील रेडीज यांच्यातील लढतीत सुनील रेडीज यांना केवळ एका मताने पराभव स्वीकारावा लागला.
प्रभाग क्रमांक 8 मध्ये माजी नगरसेवक अविनाश केळकर यांना पराभवाचा धक्का बसला, तर तरुण व नवखे उमेदवार योगेश पवार यांनी महत्त्वपूर्ण यश मिळवले.
प्रभाग क्रमांक 12 मध्ये उमा विजय देसाई व सारिका भावे यांच्यातील लढतीत सारिका भावे यांचा 55 मतांनी पराभव झाला. याच प्रभागात माजी नगरसेवक मोहन मिरगल यांनाही 195 मतांनी पराभव पत्करावा लागला.
प्रभाग क्रमांक 14 मध्ये आमदार भास्कर जाधव यांच्या सुकन्या कांचन शिंदे विजयी झाल्या, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक विकी नरळकर हे पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून आले.
या निकालामुळे चिपळूण नगर पालिकेत महायुतीचे वर्चस्व सिद्ध झाले असून, आगामी काळात नगरविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहेत.
