‘ऋषी परशुराम’ कथासंग्रहाचे परशुराम देवस्थानात प्रकाशन

डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या नवनिर्मितीचा साहित्यिक अविष्कार

चिपळूण : डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या ‘नवनिर्मितीचे ऋषी परशुराम’ या कथासंग्रहाचे प्रकाशन एक आगळ्यावेगळ्या धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाले. परशुराम देवस्थानातील गर्भगृहामध्ये, कामकाळ परशुराम या त्रिमूर्ती समोर पूजन करून आणि आशीर्वाद घेत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या सोहळ्याला परशुराम देवस्थानचे अध्यक्ष अॅड. जीवन रेळेकर, ह.भ.प. श्री धनंजय चितळे, डॉ. अभय सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ लेखक एस. के. कुलकर्णी, ह.भ.प. प्रणव बुवा गोखले, ह.भ.प. प्रभंजन भगत, तसेच डॉ. प्रशांत यांच्या मातोश्री प्रेमा पटवर्धन आणि पत्नी सायली पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास आमदार शेखर निकम यांनी शुभेच्छा देत डॉ. पटवर्धन यांचे अभिनंदन केले.

डॉ. पटवर्धन यांनी या कथासंग्रहातून परशुरामांचे सृजनशील, भक्तीमय आणि मानवतेला मार्गदर्शक असे चरित्र ओघवत्या भाषेत मांडले आहे. प्रत्येक कथेतून त्यांनी परशुरामांच्या जीवनातील विवाद्य पण प्रेरणादायी प्रसंगांचा सखोल उलगडा केला आहे. त्यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांच्या श्रद्धा, भक्तिभाव आणि देवस्थान सेवेमधूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.

या प्रसंगी महाराष्ट्रातील बीड, अकोला, लातूर, धुळे, जालना, छत्रपती संभाजीनगर, जाफराबाद, सोलापूर, पंढरपूर आणि कोकणातील पाचही जिल्ह्यांमधून प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते, अभ्यासक, संशोधक, साधक, तसेच श्री भार्गवराम परशुराम देवस्थान कार्यकारिणीचे विश्वस्त, पटवर्धन कुटुंबीय आणि परशुराम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर ‘नवनिर्मितीचे ऋषी परशुराम’ या पुस्तकातील काही निवडक कथांचे वाचन आणि अनुभव कथन सत्र घेण्यात आले. वातावरणात अध्यात्म, साहित्य आणि श्रद्धेचा संगम अनुभवायला मिळाला.

 

संबंधित लेख