मंडणगड न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय : सरन्यायाधीश भूषण गवई

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड येथे नव्याने उभारलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते रविवारी झाले. “समाजातील शेवटच्या घटकाला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळावा, हेच आमचे ध्येय आहे. या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक समानतेचे स्वप्न साकार होईल,” असे गवई यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री डॉ. उदय सामंत, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, पालक न्यायमूर्ती माधव जामदार, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. पी. तावडे, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, आमदार किरण सामंत, तसेच वकील संघाचे अध्यक्ष मिलींद लोखंडे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अमोल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

इमारतीतील सुविधा व उद्घाटन सोहळा

सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि भित्तीचित्राचे अनावरण करण्यात आले. तसेच न्यायदान कक्ष, ग्रंथालय आणि कोनशिला यांचेही उद्घाटन झाले. दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) श्रीमती अमृता जोशी यांना नव्या आसनावर विराजमान करण्यात आले.

“महाराष्ट्रातील न्यायालयीन इमारती देशात आदर्श ठरतील” — गवई

सरन्यायाधीश गवई म्हणाले, “माझ्या न्यायव्यवस्थेतील २२ वर्षांच्या प्रवासात कोल्हापूर खंडपीठाचे उद्घाटन आणि मंडणगड न्यायालयाचे उद्घाटन हे अत्यंत संस्मरणीय क्षण आहेत. महाराष्ट्र शासनाने केवळ या तालुक्यापुरतेच नव्हे तर राज्यभर सुंदर न्यायालयीन इमारती उभारल्या आहेत. देशातील कुठल्याही तालुक्यात इतक्या सुसज्ज इमारती दिसणार नाहीत,” असे ते म्हणाले.

“चिपळूण न्यायालय तातडीने मंजूर करु” — मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “८ ऑक्टोबर २०२३ रोजी आम्ही भूमिपूजन केले होते, आणि केवळ दोन वर्षांत इतकी सुंदर इमारत उभी राहिली. राज्यभर सुमारे दीडशे न्यायालयीन प्रकल्पांना मान्यता दिली असून अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. मंडणगड न्यायालयामुळे साडेचार लाख नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचतील. चिपळूण न्यायालयाच्या नव्या इमारतीची मागणी आम्ही तातडीने मंजूर करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, “आंबडवे येथील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या आराखड्याला गती देऊ,” अशीही घोषणा त्यांनी केली.

“न्यायाचे मंदिर म्हणजे लोकांचा विश्वास” — उपमुख्यमंत्री शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ही इमारत म्हणजे न्यायाचे मंदिर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेप्रमाणे समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा, यासाठी हे प्रयत्न आहेत. न्यायालयांच्या पायाभूत सुविधांवर शासन कधीच काटकसर करणार नाही,” असे त्यांनी नमूद केले.

“४० हजार लोकसंख्येच्या गावात न्यायालय — मंडणगडची वैशिष्ट्यपूर्ण ओळख” — डॉ. सामंत

पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, “देशात ४० हजार लोकसंख्या असणाऱ्या गावात दिवाणी व फौजदारी न्यायालय असणारे एकमेव ठिकाण म्हणजे मंडणगड आहे. चिपळूण न्यायालयासाठी निधी उपलब्ध करावा, तसेच आंबडवे स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाची सांगता

समारंभाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, संविधान उद्देशिका आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पालकन्यायमूर्ती माधव जामदार यांनी प्रास्ताविक केले, तर वकील संघाचे अध्यक्ष मिलींद लोखंडे यांनी आभार मानले. वकील, नागरिक आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख