डी. बी. जे. महाविद्यालयात “सडक सुरक्षा – जीवन रक्षा” विषयावर मार्गदर्शक
- by Yogesh Bandagale
- January 11, 2026
- 35 views
चिपळूण : येथील डी. बी. जे. महाविद्यालयाच्या एनसीसी व एनएसएस विभागामार्फत “सडक सुरक्षा – जीवन रक्षा” या विषयावर प्रभावी व मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आरटीओ अधिकारी आफरीन मुलानी मॅडम आणि मोहसीन आवटी सर यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना त्यांनी महामार्गावर प्रवास करताना योग्य लेनचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, हेल्मेट व सीट बेल्टचा सक्तीने वापर, मद्यपान करून वाहन न चालवणे, स्टंटबाजी टाळणे तसेच दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी न घेणे या महत्त्वाच्या नियमांवर सविस्तर प्रकाश टाकला.
तसेच मालवाहू वाहनांतून अनधिकृत प्रवासी वाहतूक करू नये, शालेय विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक टाळावी, रस्त्यावरील वाहतूक चिन्हे ओळखावीत आणि ट्रॅफिक सिग्नलचे काटेकोर पालन करावे, यावर विशेष भर देण्यात आला. “रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी असून ती राष्ट्रहितासाठी अत्यंत महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला एनसीसी विभाग प्रमुख मेजर नम्रता माने, लेफ्टनंट मधुसूदन माने, एनएसएस प्रमुख डॉ. डी. टी. कदम, कनिष्ठ महाविद्यालय एनएसएस प्रमुख अविनाश पालशेतकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ. आठवले सर होते, तर अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ. माधव बापट सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मेजर नम्रता माने यांनी आभार प्रदर्शन केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होऊन सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक संस्कृती जोपासण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
