खेर्डी चिंचघरी शाळेत “हिंद दी चादर” कार्यक्रम उत्साहात साजरा
- by Yogesh Bandagale
- February 23, 2026
- 26 views
खेर्डी चिंचघरी (सती) : सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, खेर्डी चिंचघरी (सती) येथे शासन आदेशानुसार “हिंद दी चादर” या विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शीख धर्मातील नववे गुरु Guru Tegh Bahadur यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या बलिदान व कार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत ऐकवण्यात आले. “हिंद दी चादर” ही उपाधी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या महान बलिदानामुळे त्यांना प्राप्त झाली असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या दिनाचे औचित्य साधून प्रभात फेरी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वाचन स्पर्धा तसेच समूहगायन स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. कांबळे मॅडम यांनी आपल्या भाषणातून गुरु तेग बहादुर यांच्या शौर्यगाथेची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांनी मार्गदर्शनपर भाषणात त्यांच्या त्याग, धैर्य व धर्मनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी सत्य, न्याय व मानवतेच्या मूल्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जागरूकता निर्माण झाली तसेच त्यांच्या मनात प्रेरणा जागृत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्यासह मनीषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण, विजया मौजे आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
