० ते १८ वयोगटातील बालकांसाठी दिव्यांगत्व निदान शिबिरे ३ ऑक्टोबरपासून
- by Yogesh Bandagale
- October 01, 2025
- 55 views
रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : विधी सेवा प्राधिकरण आणि समग्र शिक्षण समावेशित शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, बाल न्याय समिती उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ० ते १८ या वयोगटातील बालकांसाठी दिव्यांगत्व निदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी दिली. या शिबिरामधून कोणतेही गरजू व पात्र बालक वंचित राहणार नाही याची काळजी संबंधित अंगणवाडी सेविका व विशेष शिक्षिका यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व्ही. वाय. जाधव आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिल्या आहेत. या शिबिरामध्ये शारीरिक, बौद्धिक किंवा विकासात्मक दिव्यांगत्व असलेल्या बालकांची तपासणी करून त्यांना युनिक डिसअॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड वितरित करण्यात येणार आहे. या कार्डच्या आधारे पात्रतेनुसार सहाय्यक साधने वितरित केली जाणार असून, विविध शासकीय योजनांची माहितीही पालकांना देण्यात येईल.
शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे – शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय लांजा, शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय राजापूर, सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय देवरुख, मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय गुहागर, बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी शासकीय रुग्णालय रत्नागिरी, गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय कामथे, मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय खेड, बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय मंडणगड आणि गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय दापोली.
शिबिरात सहभागी होण्यापूर्वी संबंधित तालुक्यानुसार www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करून सेंटरची निवड करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना अडचण आल्यास जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, रत्नागिरी (मो. ९८३४४४०२००) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा. तपासणीकरिता नोंदणीची प्रत, आधारकार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, जिल्ह्यातील रेशनकार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
