कापरे येथे नागार्जुन देवस्थानतर्फे कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

तरुणाईची मातीशी नाळ जोडण्यासाठी उपक्रम; विनायक पवार यांचे मार्गदर्शन

कापरे (चिपळूण) : चिपळूण तालुक्यातील श्री देव नागार्जुन देवस्थान यांच्या वतीने १९ ऑक्टोबरपासून कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थानचे उपाध्यक्ष जयराज कदम यांनी दिली.

या उपक्रमामागचा उद्देश शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, युवा मंडळी यांनी काही वेळ मैदानावर जाऊन खेळाशी आणि मातीशी पुन्हा नाळ जोडावी, हा आहे. खेळाडूंमध्ये शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि संघभावना निर्माण व्हावी यासाठी हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

या शिबिराचे मार्गदर्शन मार्कंडे येथील नामवंत कबड्डीपटू विनायक पवार करत असून, देवस्थानचे अध्यक्ष अनंत मोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

या प्रशिक्षण शिबिरासाठी सल्लागार म्हणून बळीराम मोरे, चेअरमन गुरव गुरुजी, तसेच दत्ताराम मोरे, विजय बांद्रे, आशिष मोरे, अवधूत मोरे, सतीश मोरे, दगडू कदम, सुरेश मोरे, विजय कदम, दिलीप मोरे आणि संजय कदम यांच्यासह अनेक ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.

शिबिरात खेळाडूंना तंत्रशुद्ध पद्धतीने कबड्डीचे प्रशिक्षण दिले जात असून, गावातील तरुणाई या उपक्रमात उत्साहाने सहभागी होत आहे. गावातील देवस्थानच्या सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांना मिळणारा हा प्रतिसाद कापरे गावातील खेळ संस्कृतीला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

संबंधित लेख