पोसरे येथे नवीन ग्राममंदिरात २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा
- by Yogesh Bandagale
- February 16, 2026
- 235 views
चिपळूण, दि. १६ : चिपळूण तालुक्यातील निसर्गरम्य पोसरे गावातील “नवीन ग्राममंदिर काजूवाकण” येथे मुर्त्यांची शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा शुक्रवार दि. २० ते रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. “एक गाव, एक मंदिर” या संकल्पनेतून मध्यवर्ती ठिकाणी व मुख्य रस्त्यालगत ५६ गुंठे विस्तीर्ण जागेवर भव्य-दिव्य मंदिर उभारण्यात आले आहे.
मंदिराचे बांधकाम २०२२ मध्ये पूर्ण झाल्यानंतर जुन्या मंदिरातील मुर्त्या नव्या मंदिरात स्थापित करण्याची ग्रामस्थांची इच्छा होती. मात्र गावात ऐक्य अबाधित राहावे आणि भविष्यातील व्यापक दृष्टी ठेवून नवीन मुर्त्या स्थानापन्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यटन दर्जा ‘क’ अंतर्गत पायाभूत सुविधांसाठी शासकीय निधी तसेच सार्वजनिक सभागृहाचे बांधकामही मंदिर परिसरात करण्यात आले आहे.
तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम
शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी खेड तालुक्यातील धामणंद येथून पाषाणी मुर्त्यांची ढोल-ताशांच्या गजरात, गुळाल उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य रथातून पोसरे येथे जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी राक्षोघ्न होम व रात्री स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
शनिवार दि. २१ फेब्रुवारी रोजी मंदिराची षोडशोपचार पूजा पार पडणार असून सायंकाळी ब्रह्मानंद भारती महाराज यांचे आगमन होणार आहे. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत आळंदीचे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री बालाजी महादेव मेटे यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना गायनाचार्य ह.भ.प. श्री भागवत महाराज रिंगणे, मृदंगमणी ह.भ.प. श्री संदीप महाराज शिंदे व श्री विश्वास तामुंडकर यांची साथ लाभणार आहे.
रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व ब्रह्मानंद भारती महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण सोहळा पार पडणार आहे. नांदेडचे शिल्पकार श्री अनिल चांदोजी ससाणे यांच्या कल्पकतेतून साकारलेला ६१ फूट उंचीचा हेमाडपंथी शैलीतील मागील घुमट आणि ४१ फूट उंचीचा पुढील घुमट हे मंदिराचे वैशिष्ट्य ठरणार आहे. धामणंद (ता. खेड) येथील पाषाणी मूर्तिकार श्री जगन्नाथ सुतार यांनी मुर्त्यांची निर्मिती केली असून गोंधळे गावचे पुरोहित श्री भालचंद्र जोशी धार्मिक विधी पार पाडणार आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास उदय सामंत (उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री), योगेश कदम (गृहराज्यमंत्री), भास्करराव जाधव, शेखर निकम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय प्रथमच पोसरे माहेरवासिनींचा सामूहिक हळदी-कुंकू कार्यक्रम व देणगीदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी रात्री १० वाजता समर्थ कृपा प्रॉडक्शन निर्मित “कोकणचा साज, संगमेश्वरी बाज” हा विनोदी लोकनाट्य कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.
तीनही दिवस भाविकांसाठी चहा, नाश्ता व महाप्रसादाची व्यवस्था देवस्थानतर्फे करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
