खेंड भागात कुत्र्यांच्या हल्ल्यातून विद्यार्थिनी थोडक्यात बचावली
- by Yogesh Bandagale
- January 03, 2026
- 178 views
चिपळूण : येथील संसारे नाका परिसरात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात परांजपे हायस्कूलची १० वर्षीय विद्यार्थिनी थोडक्यात बचावली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संसारे नाका परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या एका महिलेने सुमारे २० ते २५ कुत्रे पाळले असून, हे कुत्रे ये-जा करणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांच्या अंगावर वारंवार धावून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आज सकाळी ही विद्यार्थिनी शाळेत जात असताना या कुत्र्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र, त्याच वेळी जवळच उपस्थित असलेल्या चार ते पाच नागरिकांनी प्रसंगावधान राखत धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आणि विद्यार्थिनीचे प्राण वाचले.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून, नगर पालिका, पोलीस प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून या बेकायदेशीर वास्तव्यावर कारवाई करावी आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष उमेश सटपाल यांनी नागरिकांना याबाबत आश्वस्त करत भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात येईल व आवश्यक उपाययोजना राबवण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.
