गोवळकोट बौद्धवाडीतील दरडग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी नगराध्यक्षांचा पुढाकार
- by Yogesh Bandagale
- February 01, 2026
- 44 views
चिपळूण | प्रतिनिधी: शहरातील गोवळकोट बौद्धवाडी येथील सहा घरांतील १५ कुटुंबांना दरड कोसळण्याच्या भीतीमुळे यापूर्वी स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र, अद्याप या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन झालेले नसून ही कुटुंबे सध्या पेठमाप व गोवळकोट शाळेत तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत. या पार्श्वभूमीवर “नगराध्यक्ष आपल्या दारी” हा उपक्रम राबवत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही गोवळकोट कदम बौद्धवाडी येथे भेट देत प्रत्यक्ष धोकादायक दरडीची पाहणी केली.
या वेळी त्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता नगर पालिकेच्या प्रशासनासह पुन्हा पाहणी करून दरडीच्या खाली व वर असलेल्या घरांच्या जागेची मोजणी केली जाईल आणि त्यानंतर संरक्षित भिंत उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
याआधी शांतिदूत बुद्धविहार येथे सत्काराचा कार्यक्रम पार पडला. बौद्धजन हितवर्धक समिती व यशोधरा महिला मंडळ यांच्यावतीने नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक उदय जुवळे आणि नगरसेविका मिस्बाह नाखुदा यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार अध्यक्ष सुरेश कदम, सुलभा कदम, मंदा कदम व सुदाम मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अभिमन्यू बुरटे, श्री. निवाते, परीघ पटेल, अजगर नाखुदा आदी उपस्थित होते.
दरम्यान, परिसरात दररोज स्वच्छता व्यवस्थित राहावी, यासाठी नगराध्यक्षांनी आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते यांना दूरध्वनीद्वारे तातडीच्या सूचना दिल्या.
“गेल्या दहा वर्षांपासून ही कुटुंबे याच परिसरात राहत असून आजवर दरड कोसळलेली नाही. आपण एक पाऊल पुढे टाकू, आपली घरे इथेच सुरक्षितपणे बांधण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेन,” असे आश्वासन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिले.
दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसह जागेची मोजणी करून संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाचे सचिव विजय कदम यांनी आभार मानले.
