चिपळूणमधील नामवंत कलाकार श्री. घारे पेंटर यांचे निधन
- by Yogesh Bandagale
- December 24, 2025
- 239 views
चिपळूण : चिपळूणमधील शांत, मृदू स्वभावाचे आणि प्रतिथयश कलाकार श्री. घारे पेंटर यांचे उपचारादरम्यान आज सकाळी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने चिपळूणसह संपूर्ण कोकणातील कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
श्री. घारे पेंटर यांच्यावर आजच सायंकाळी कागल (जि. कोल्हापूर) येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चित्रकलेत आणि भित्तीचित्रांमध्ये त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वत्र प्रिय होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या युगातही त्यांच्या हातातील ब्रशला सतत काम होते, हे त्यांच्या कलेची खोली आणि विश्वासार्हतेचे द्योतक होते.
चिपळूणच्या कला विश्वात सहज न दिसणारे, पण खोलवर जाणवणारे नुकसान त्यांच्या जाण्याने झाले आहे. एक संवेदनशील, मेहनती आणि प्रामाणिक कलाकार आपल्यातून निघून गेला, अशी भावना कला रसिक, सहकारी कलाकार आणि नागरिक व्यक्त करीत आहेत.
त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ भरून न निघणारी आहे. श्री. घारे पेंटर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
