शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण सोहळा उत्साहात
- by Yogesh Bandagale
- January 01, 2026
- 33 views
वेरवली येथील शैक्षणिक संकुलाच्या कोनशिलेचे अनावरण; मान्यवरांची उपस्थिती
वेरवली (ता. लांजा) : वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय, तु. पु. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय व यामाहा ट्रेनिंग स्कूल या शैक्षणिक संकुलाच्या कोनशिलेचे अनावरण व ‘शैलेश रमेश डोळस विद्यानगरी’ नामकरण सोहळा जल्लोषात पार पडला. या प्रसंगी श्रीमती रोहिणी रमेश डोळस यांच्या शुभहस्ते मुख्य कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमास श्री गिरीश काशिनाथ कोळवणकर, श्री रवींद्र (अण्णा) द्वारकानाथ सामंत, श्री विश्वास परशुराम चितळे, श्री श्रीधर रघुनाथ ठाकूर व श्री मारुती रामचंद्र डोळस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री शैलेश रमेश डोळस व त्यांच्या परिवाराचे ढोल-ताशा, पुष्पवृष्टी व औक्षण करून स्वागत करण्यात आले. ‘शैलेश रमेश डोळस विद्यानगरी’ या नामफलकाचे अनावरण श्री रवींद्र सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्रीमती रोहिणी रमेश डोळस सांस्कृतिक भवनाचे अनावरण श्री विश्वास चितळे, सभागृहाच्या कोनशिलेचे अनावरण श्री श्रीधर ठाकूर, रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष श्री मारुती डोळस, तर रमेश धोंडू डोळस सभागृहाच्या नामफलकाचे अनावरण श्री गिरीश कोळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमात मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शालेय परिसराला ‘शैलेश रमेश डोळस’ हे नाव देण्यामागील हेतू श्री अमोल रेडीज यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केला. संस्थेप्रती दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल श्री शैलेश रमेश डोळस व त्यांच्या परिवाराचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
सत्कारमूर्ती श्री शैलेश रमेश डोळस यांनी आपल्या मनोगतातून शाळेशी असलेले ऋणानुबंध व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनीही त्यांच्या दातृत्व भावनेचे व शिक्षणप्रेमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद बंडगर, तर आभार प्रदर्शन श्री सचिन कांबळे यांनी केले.
सायंकाळी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. दीपप्रज्वलनानंतर नटराज व सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शैलेश रमेश डोळस यांच्या मित्रमंडळींच्या प्रतिक्रिया ए.व्ही. माध्यमातून डिजिटल स्क्रीनवर दाखवण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी दीप नृत्य, लोकनृत्य, दिंडी, भारुड, लावणी, जाकडी आदी कलाप्रकार सादर करून रंगमंच गाजवला. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुतिक प्रभुलकर व सौ. साक्षी हटकर यांनी केले, तर आभार श्री सचिन कांबळे यांनी मानले.
या नामकरण सोहळ्यामुळे शैक्षणिक संकुलाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांतून व्यक्त होत होती.
