देवरूख येथे उद्या सौ. नेहा रविंद्र माने यांचा सन्मान सोहळा
- by Yogesh Bandagale
- December 19, 2025
- 52 views
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, आंबव–देवरूखच्या कार्याध्यक्षा सौ. नेहा रविंद्र माने यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्यावतीने उद्या शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता देवरूख येथील मराठा भवन येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सौ. नेहा माने या माजी राज्यमंत्री श्री. रविंद्र माने यांच्या पत्नी असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे राज्य सहसचिव व युवानेते श्री. प्रद्युम्न माने यांच्या त्या मातोश्री आहेत. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या महिला संपर्क संघटक म्हणूनही कार्यरत आहेत. याशिवाय त्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका आहेत. दि. २० डिसेंबर रोजी त्या आपल्या आयुष्याची षष्ठब्दी (६० वर्षे) पूर्ण करीत आहेत.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच सहकार क्षेत्रात सक्रियपणे कार्य करणाऱ्या सौ. नेहा माने या कार्यकुशल व बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. समाजाप्रती असलेले त्यांचे ऋण व्यक्त करण्याच्या उद्देशाने त्यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या सोहळ्यात पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
