मुंबई-गोवा महामार्ग मेअखेर पूर्ण होणार; नितीन गडकरींची ग्वाही

सावंतवाडी : अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा मुद्दा ठरलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासादायक घोषणा केली आहे. मे महिना संपण्यापूर्वी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

“राजकारणात खोटं बोलत नाही”
आपल्या खास शैलीत बोलताना गडकरी म्हणाले, “या रस्त्याबाबत अनेकांनी मला प्रश्न विचारले आहेत. राणे साहेब शब्दाचे पक्के आहेत, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत मी स्पष्ट सांगतो की, राजकारणात मी खोटं बोलत नाही. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी हा मार्ग पूर्णत्वास जाईल आणि प्रवाशांचा त्रास कमी होईल.”
महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे झालेली बदनामी मान्य करत, काम पूर्ण झाल्यानंतर आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई ते गोवा असा प्रवास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गालाही गती
यावेळी गडकरी यांनी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाबाबतही माहिती दिली. या मार्गाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम आणि बोगद्याचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि रखडलेले काम यामुळे नागरिक त्रस्त होते. प्रवाशांचा वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणात वाया जात होते. आता गडकरी यांच्या घोषणेमुळे महामार्ग पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली असून, यामुळे कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

या कार्यक्रमाला नितेश राणे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, निलेश राणे, दीपक केसरकर आणि प्रसाद लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख