ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका!; एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नवा सॉफ्टवेअर डोकेदुखी ठरला
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 29 views
मुंबई दि. १६ : दिवाळीचा सण काही दिवसांवर आला असताना एसटी बसने गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याने प्रवाशांचे आरक्षण अडकले असून कर्मचाऱ्यांनाही नव्या सॉफ्टवेअरमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
दोन वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर बदल, पण…
एसटी महामंडळाने दोन वर्षांपूर्वी जुनी आरक्षण प्रणाली बदलून नवीन सॉफ्टवेअर प्रणाली सुरू केली होती. मात्र ही प्रणाली अधिक गुंतागुंतीची ठरल्याने कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रणाली ठप्प झाल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
खर्चात वाढ आणि कर्मचारी त्रस्त
नव्या आरक्षण सॉफ्टवेअरमुळे प्रशासनावर आर्थिक भारही वाढला आहे. पूर्वी एका गाडीसाठी केवळ एकच आरक्षण मेमो प्रिंट केला जात असे, आता त्याच प्रक्रियेसाठी तीन कागद लागतात. त्यामुळे कागदाचा आणि देखभालीचा खर्च तिपटीने वाढला आहे.
काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “जुनी प्रणाली अधिक सोपी आणि वापरास सुलभ होती. मात्र नवी प्रणाली किचकट असल्याने कामकाज उशिरा पूर्ण होतं. परिणामी प्रवासीही नाराज आणि कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.”
दिवाळी बोनसची घोषणा, पण आनंदावर विरजण
दरम्यान, राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान (बोनस) आणि १२ हजार रुपयांच्या उचल योजनेची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ४८ हप्त्यांमध्ये २२०० कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी दिली गेली आहे.
मात्र, आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याने कर्मचाऱ्यांचा आनंद कमी झाला असून प्रवाशांचा त्रास अधिक वाढला आहे.
प्रवाशांची मागणी : “जुनी प्रणाली परत आणा”
दररोज प्रवास करणारे आणि गावी जाणारे प्रवासी आता जुन्या आरक्षण प्रणालीची मागणी करत आहेत. “नवीन सॉफ्टवेअर चालत नाही, तिकीट मिळत नाही, आरक्षण पावती उशिरा मिळते,” अशी प्रवाशांची तक्रार आहे.
