उमेदवार शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला
- by Yogesh Bandagale
- December 30, 2025
- 207 views
मुंबई : राज्यात येत्या 15 जानेवारीला मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. आज उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी इच्छुक व पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पळापळ सुरू झाली आहे. त्यातच मुंबईतील एका पक्षाच्या उमेदवारासोबत एक विचित्र प्रसंग घडला आहे. हा उमेदवार आपल्या समर्थकांसह वाजंत्री घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात पोहोचला. पण ऐनवेळी उमेदवारी अर्जच आपण आणला नसल्याची बाब त्याच्या लक्षात आली. यामुळे हसावे की रडावे असा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला.
यासंबंधीच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज शेवटच्या दिवशी मुलुंड, भांडुप व विक्रोळी परिसरात चांगलाच रंग चढला. टी आणि एस वॉर्डाच्या निवडणूक कार्यालयांबाहेर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरण्यास सुरुवात केली. या गदारोळात एका पक्षाचा उमेदवार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक कार्यालयात पोहोचला. पण तो फॉर्मच विसरल्याने कार्यकर्त्यांत काही काळ हास्याचा फवारा उडाला.
नेमका काय घडला प्रसंग?
त्याचे झाले असे की, एका पक्षाचा उमेदवार गोवंडी, मानखुर्द, भांडुप, सोनापूर येथील कार्यकर्त्यांना घेऊन शक्तिप्रदर्शन करत गाड्यांचा ताफा घेऊन टी वॉर्डच्या कालिदास येथील निवडणूक कार्यालयाबाहेर पोहोचला. यावेळी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत त्याला मोजक्याच कार्यकर्त्यांसह आत जाण्याची परवानगी दिली. आत जाण्यापूर्वी त्याने आपल्या सहकाऱ्यांना अरे फॉर्म कुठाय? असा प्रश्न केला. त्यावर कार्यकर्ते एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांचा गोंधळ उडाला. अखेर चौकशीअंती उमेदवारी अर्ज घेऊन येणारा कार्यकर्ता गर्दीत मागेच राहिल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.
यामुळे उमेदवाराची चांगलीच गोची झाली. कार्यालयाबाहेर थांबलेले त्यांचे समर्थक दादा, आत का जात नाहीत? असा प्रश्न करत होते. पण तेवढ्यात कुणीतरी काही नाही, अर्ज विसरलेत, असे त्यांना सांगितले. हे ऐकताच अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यानंतर 10-15 मिनिटांनी अर्ज असलेला कार्यकर्ता धापा टाकत निवडणूक कार्यालयात पोहोचला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अखेर उमेदवार आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह अर्जाची फाईल घेऊन निवडणूक कार्यालयात दाखल झाला आणि आपला अर्ज भरला.
