सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार!
- by Yogesh Bandagale
- January 30, 2026
- 240 views
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदावर कोण बसणार, अशी चर्चा सुरू झाली असून यात सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला असल्याचे समजते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी पक्षाची बैठक होणार असून या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली होती.
उद्याच्या बैठकीत सगळ्यांचे एकमत झाले तर उद्याच शपथविधी होऊ शकतो, असे सूचक विधान छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना केले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरतील. तसेच नरेश आरोरा हे सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याचे देखील समोर आले आहे. राजकीय गोष्टींची चर्चा करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी नरेश आरोरा यांना बारामती येथे बोलावले असल्याची माहिती आहे. त्यानुसार नरेश आरोरा आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर त्यांचा निरोप घेऊन आरोरा मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, लोकांची जी मागणी आहे ती रास्त आहे. सुनेत्रा ताईंकडे पक्ष प्रमुख पद देण्यात यावे. अनेक लोकांची अशी मागणी आहे आणि त्यात काही चूक आहे, असे मला वाटत नाही. पण शेवटी याबाबत जो काही निर्णय होणार आहे तो सीएलपीमध्ये होईल. भुजबळ यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेविषयी विचारले असता, त्यांनी याबाबत मला फारसे काही माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे.
