प्रशांत जगताप अखेर काँग्रेसवासी

मुंबई :  पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकत आज अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे झालेल्या या पक्षप्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडल्याचं स्पष्ट झालं आहे. पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या हालचालींमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली होती. गुप्त बैठका, नेत्यांच्या गाठीभेटी आणि पडद्यामागील चर्चा सुरू असतानाच या संभाव्य युतीला उघड विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राजीनामा जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच प्रशांत जगताप यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट चित्र समोर आलं. आज दुपारी पुण्यातील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात त्यांचा अधिकृत प्रवेश पार पडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील धोरणात्मक भूमिकांबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या जगताप यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपल्या राजकीय निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. त्यांच्या प्रवेशामुळे पुण्यात काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचं राजकीय जाणकारांकडून बोललं जात आहे.

दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश होण्यापूर्वी प्रशांत जगताप यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती. खुद्द उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना फोन करून थेट संवाद साधल्याची माहिती समोर आली होती. गुरुवारी रात्री सुमारे नऊ मिनिटे दोघांमध्ये फोनवर चर्चा झाली. या संभाषणात उद्धव ठाकरे यांनी जगताप यांना पक्षात येण्याचं आमंत्रण देत योग्य सन्मान दिला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. तसेच शिवसेना ठाकरे गट भाजपसोबत जाणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केल्याचं समजतं. याशिवाय ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी गेल्या दोन दिवसांत जगताप यांच्याशी संपर्क साधला होता.

संबंधित लेख