गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्व मंत्र्यांचा राजीनामा
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 164 views
गांधीनगर : गुजरातमध्ये आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना सोडून राज्यातील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला असून, राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या घडामोडीमुळे भाजपच्या अंतर्गत चर्चेला चांगलाच ऊत आला आहे.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे मुख्यमंत्रींकडे सोपवले. त्यानंतर हे राजीनामे राज्यपाल देवव्रत आचार्य यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व मंत्र्यांचे राजीनामे आधीपासूनच तयार ठेवण्यात आले होते आणि त्यावर सहीही होती. बैठकीनंतर हे सर्व राजीनामे एकाचवेळी सादर करण्यात आले.
दरम्यान, नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या (१७ ऑक्टोबर) रोजी पार पडणार असून त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री ९ वाजता गुजरातमध्ये पोहोचणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील शुक्रवारी सकाळी गांधीनगरला दाखल होतील. राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सल हेही आज गुजरातमध्ये दाखल होणार आहेत.
सध्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह १७ मंत्री आहेत, ज्यात आठ कॅबिनेट आणि आठ राज्यमंत्री आहेत. तीन वर्षांपासून या मंत्रिमंडळात कोणतेही बदल झालेले नव्हते. आता हा निर्णय आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मोठा राजकीय डाव मानला जात आहे.
भाजप हायकमांडच्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात काही नवीन चेहरे आणि अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात येणार आहे. अर्जुन मोढवाडिया, अल्पेश ठाकोर, सी. जे. चावडा आणि हार्दिक पटेल यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सौराष्ट्रातील जयेश राडाडिया आणि जितू वाघानी हे नवे मंत्री म्हणून शपथ घेतील, अशीही चर्चा आहे. विशेषतः पाटीदार आणि ठाकोर समाजाला प्रतिनिधित्व देण्यावर भर दिला जाणार आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, अलीकडेच झालेल्या विसावदर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर पक्षाने या व्यापक फेरबदलाचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाच्या गोपाल इटालिया यांनी मिळवलेला विजय हा भाजपसाठी मोठा धक्का ठरला असून, आगामी निवडणुकांपूर्वी सत्ताविरोधी लाट कमी करण्यासाठी हा ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
मोदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळापासून गुजरातमध्ये अशा प्रकारचे राजकीय बदल वेळोवेळी होत आले आहेत. आनंदीबेन पटेल आणि विजय रुपाणी यांच्या सरकारनंतर आता भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळातला हा नवा फेरबदल म्हणजे भाजपसाठी निवडणुकीपूर्वीचा मोठा ‘राजकीय रिसेट’ ठरू शकतो.
