तो परत आला! ‘हास्यजत्रेत’ कोकण कोहिनूर ओंकार भोजनेची धमाकेदार एन्ट्री

मुंबई : मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी! लोकप्रिय कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये ‘कोकण कोहिनूर’ म्हणून ओळखला जाणारा  चिपळूण सुपुत्र ओंकार भोजने पुन्हा एकदा परतला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ओंकार आपल्या खास विनोदी अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला असून हास्यजत्रेच्या मंचावर पुन्हा कॉमेडीचा तडका लागणार आहे.

ओंकार भोजने आणि हास्यजत्रा हे समीकरण प्रेक्षकांच्या मनात कायमचे कोरले गेले आहे. ‘अगं अगं आई...’ म्हणणारा ओंक्या असो वा ‘हा इथे काय करतोय?’ विचारणारा मामा — या भूमिकांमधून ओंकारने आपल्या विनोदी अभिनयाने घराघरात लोकप्रियता मिळवली.

काही काळासाठी ओंकारने हास्यजत्रेतून ब्रेक घेतला होता. त्यावेळी त्याच्या चित्रपटातील कामामुळे त्याने शो सोडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या काळात त्याचा एक मराठी चित्रपटही प्रदर्शित झाला.

आता मात्र दिवाळीच्या या सणावर ओंकारची पुन्हा ‘रि-एन्ट्री’ झाली आहे. सोनी मराठी वाहिनीने प्रदर्शित केलेल्या नव्या प्रोमोमध्ये ओंकारने आपल्या खास शैलीत “मामा” हे पात्र साकारले असून त्याच्या एन्ट्रीनं प्रेक्षकांमध्ये नव्या उत्साहाची लाट निर्माण केली आहे.

हास्यजत्रेच्या मंचावर नम्रता संभेराव, समीर चौगुले, वनिता खरात आणि इतर कलाकारांसोबत ओंकारची जुगलबंदी पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी एक हास्यसोहळाच असतो.
 

संबंधित लेख