आयएएस अधिकारी देवेंद्र सिंग निलंबित
- by Yogesh Bandagale
- February 27, 2026
- 12081 views
मुंबई : राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मंत्रालयात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीस अनुपस्थित राहिल्याने आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी निलंबनाचे आदेश दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने ही कारवाई केली. देवेंद्र सिंग हे यापूर्वी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
एम. देवेंद्र सिंग (MH:2011 बॅच) सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. विधानसभेतील चर्चेदरम्यान मंत्र्यांच्या ब्रीफिंगसाठी त्यांना बोलावण्यात आले होते; मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली होती. अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या स्वाक्षरीने निलंबन आदेश जारी करण्यात आला आहे.
निलंबन काळातील अटी
अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
-
निलंबन काळात त्यांचे मुख्यालय मुंबई येथे राहील.
-
कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांची पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.
-
कोणतीही खासगी नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय स्वीकारता येणार नाही.
-
निर्वाह भत्ता व इतर भत्ते मिळण्यासाठी इतर कोणत्याही उपजीविकेत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
अटींचे उल्लंघन झाल्यास पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, “एक आयएएस अधिकारी मंत्री महोदयांना ब्रीफिंग देण्यासाठी येणार नाही असे म्हणतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अध्यक्षांनी कालच निलंबनाचे आदेश दिले होते आणि २४ तासांत कारवाई झाली. संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही.”
या घटनेमुळे अधिवेशन काळात प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाबाबत चर्चा रंगल्या आहेत.
