तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य; महसूलमंत्री बावनकुळे यांचे आश्वासन
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 72 views
मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने अखेर सकारात्मक भूमिका घेतली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले असून, यामुळे राज्यभरातील महसूल सेवकांना दिलासा मिळणार आहे.
मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक
मंत्रालयात महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीस मुख्य सचिव राजेश मिना, अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, तसेच महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीमध्ये (Class IV) समाविष्ट करून मानधनाऐवजी वेतनश्रेणी (Pay Scale) मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, सध्याच्या नियमांनुसार अशा प्रकारे वेतनश्रेणी लागू करता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तलाठी भरतीत विशेष प्राधान्य
महसूलमंत्र्यांनी महसूल सेवकांना न्याय मिळावा यासाठी पर्याय सूचवला. त्यानुसार, तलाठी भरतीमध्ये काही जागा महसूल सेवकांसाठी राखीव ठेवाव्यात, आणि ज्यांना किमान पाच वर्षांचा अनुभव आहे, अशा सेवकांना २५ अतिरिक्त गुण देण्याचा प्रस्ताव मांडला. अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या संदर्भात लवकरच शासन निर्णय (GR) निघण्याची शक्यता आहे.
सेवकांच्या इतर मागण्यांकडेही सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन
बैठकीत महसूलमंत्री बावनकुळे यांनी महसूल सेवकांच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, सरकार महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवेल. पूर्वीच त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून, पुढील काळात त्यांच्या सेवाशर्ती अधिक सुलभ करण्यासाठी पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे राज्यातील महसूल सेवकांना न्याय आणि स्थैर्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
