सशक्त साथ अभियान; चिपळूणच्या महिलांकडून परांडा तालुक्यातील पूरग्रस्त भगिनींना ६४० साड्यांचे ‘माहेरवाण’

चिपळूण : पूरग्रस्त भगिनींना प्रेम, सन्मान आणि आशेचा संदेश देणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम सशक्त साथ अभियान परांडा तालुक्यात राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत वूमन सपोर्ट वूमन या संस्थेमार्फत चिपळूणमधील महिलांनी तब्बल ६४० साड्या परांडा तालुक्यातील पिठापुरी, लाखी आणि ढगपिंपरी (जि. धाराशिव) या गावांमध्ये पाठवून एक अनोखे “माहेरवाण” पोचवले.

या अभियानाची संकल्पना वूमन सपोर्ट वूमन संस्थेच्या अध्यक्ष व संस्थापक डॉ. कांचन मदार यांनी मांडली होती. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत समस्त चिपळूणमधील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिनांक १० ऑक्टोबर रोजी, संस्थेच्या वतीने जिजाऊ ब्रिगेडच्या रोहिणी मोरे आणि दिलाबर खान यांनी प्रत्यक्ष परांडा येथे जाऊन पूरग्रस्त भगिनींना साड्या वाटप केल्या. त्यांच्या या कार्याचे परांडावासीयांनी मनःपूर्वक स्वागत व सन्मान केला.

सदर उपक्रमात २४० साड्या वूमन सपोर्ट वूमन संस्थेतर्फे पिठापुरी आणि लाखी गावांमध्ये वाटण्यात आल्या, तर उर्वरित ४०० साड्यांपैकी १४० साड्या रामापूर आरोग्य केंद्र व ग्रामस्थ महिलांना, १३६ साड्या चिपळूण महिला मंचकडून, ५० साड्या इंडियन मेडिकल असोसिएशन वूमन डॉक्टर्स विंगकडून, ५० साड्या जिजाऊ ब्रिगेडकडून, ११ साड्या तालुका आरोग्य विभागाकडून, १० साड्या प्रयास ग्रुपकडून तर उर्वरित साड्या चिपळूणमधील सन्मानीय महिलांकडून भेट म्हणून देण्यात आल्या.

या उपक्रमात खेडच्या प्रांताधिकारी वैशाली पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुनी, जिजाऊ ब्रिगेडच्या स्नेहल चव्हाण, डॉ. रेहमत जबले, नंदिनी कदम (ST महामंडळ), तसेच वूमन सपोर्ट वूमनच्या सदस्य शारदा आव्हाड, प्रमिला तटकरे, पूर्वा तांदळे आणि सुकन्या चव्हाण उपस्थित होत्या.

या उपक्रमाची दखल इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्याने घेतली असून, आएएमए संयोजिका डॉ. कांचन मदार, वूमन डॉक्टर्स आणि चिपळूणमधील सर्व महिलांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. 
 

संबंधित लेख