पोमेंडी देवराईत पक्षी मित्र संमेलनाची रंगतदार सांगता; दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन
- by Yogesh Bandagale
- February 23, 2026
- 44 views
रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) : वेळ सकाळी सात-साडेसात... स्थळ पोमेंडीची देवराई... आणि सुरेल किलबिलाटात पक्षी मित्र संमेलन 2026 ची सांगता अविस्मरणीय ठरली. वन विभाग आयोजित या संमेलनाची समाप्ती प्रत्यक्ष क्षेत्रीय भेट आणि पक्षीनिरीक्षणाने झाली.
सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतिक मोरे, पक्षी मित्र विराज आठल्ये, निकिता शिंदे यांच्यासह राज्यभरातून आलेले पक्षी मित्र व निरीक्षक देवराईत एकत्र जमले. पक्ष्यांच्या सुरेल आवाजानेच जणू त्यांचे स्वागत झाले. काजरा वृक्षाची माहिती प्रतिक मोरे यांनी दिली. सुरुवातीलाच मलबार पाईड हॉर्नबिलने झलक दाखवत निरीक्षणाची दमदार सुरुवात करून दिली.
एशियन ब्लॅक ड्रोंगो (कोतवाल) झाडावर आपले वर्चस्व प्रस्थापित करताना दिसला. त्याचवेळी ब्लॅक हेडेड बार्बेट (तपकिरी डोक्याचा तांबट) ‘कुटुर-कुटुर’ आवाजात साद घालत होता. इंडियन आयोरा (सुभग), सूर्यपक्षी, मादी कोकीळ, फुलटोच्या, फूलचुक्या आदी पक्ष्यांची उपस्थितीही जाणवत होती. काळ टोप्या हळद्याचा मधुर सूर परिसरात घुमत होता.
विशेष आकर्षण ठरले ते जंगल वुड आऊल (वन घुबड) या जोडीचे दर्शन. पुलाखालील झाडाच्या वेलीच्या चौकटीत बसलेले हे जोडीदार बराच वेळ प्रणयराधनेत रमलेले दिसले. त्यानंतर ब्लू इअर्ड किंगफिशर (निलकर्ण खंड्या) अचानक पाण्यात डुबकी मारून सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचा निळा रंग आणि ऐटबाज थाट कॅमेऱ्यांत टिपला गेला.
जंगल बदामाच्या फांदीवरील घरट्यातील फ्लॉवर पेकर (फुलटोच्या), ब्लॅक नेपेड मोनार्च (जांभळी लिटकुरी) यांची उपस्थितीही निरीक्षकांना सुखावून गेली. परतीच्या मार्गावर दयाळ, बुलबुल, सुभग यांच्या शीळा आणि सूर्यपक्ष्यांचे चिवचिवणे ऐकू येत होते.
या अविस्मरणीय पक्षीदर्शनामुळे राज्याच्या विविध भागांतून आलेले पक्षी मित्र व निरीक्षक मनापासून आनंदित झाले. निसर्गाच्या सान्निध्यात पार पडलेली ही सांगता संमेलनाच्या आठवणीत कायमची कोरली गेली.
