माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव : आरोग्य समृद्ध महाराष्ट्रासाठी लोकचळवळ
- by Yogesh Bandagale
- April 19, 2026
- 188 views
-डॉ. कांचन मदार
सिनियर स्त्रीरोगतज्ञ
उपजिल्हा रुग्णालय कामथे, चिपळूण (जि. रत्नागिरी)
महाराष्ट्र शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळत आहे. हे अभियान केवळ एक योजना नसून “जनतेच्या सहभागातून घडणारी आरोग्य क्रांती” आहे. प्रत्येक गाव निरोगी, सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर यांसारखे असंसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत आहेत. त्याचबरोबर मातामृत्यू व बालमृत्यू यांसारख्या समस्या ग्रामीण भागात अजूनही चिंतेचा विषय आहेत. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा (Preventive Care) आणि लवकर निदान (Early Detection) यावर भर देणे ही काळाची गरज आहे.
या अभियानाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे गाव पातळीवर आरोग्य स्पर्धा व रँकिंग प्रणाली, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर आकर्षक पुरस्कार, स्वच्छता, शुद्ध पाणी, पोषण व आरोग्य यांचा एकत्रित विचार, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व इतर यंत्रणांचा समन्वय आणि “People’s Movement” म्हणून जनसहभागाला दिलेले प्राधान्य.
उपजिल्हा रुग्णालय व CPHC अंतर्गत प्राधान्य क्षेत्रांमध्ये मातृ व बाल आरोग्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक गर्भवतीची लवकर नोंदणी, किमान चार ANC तपासण्या, उच्चजोखीम गर्भवतींची वेळेवर ओळख व रेफरल, तसेच सुरक्षित प्रसूती व प्रसूतीनंतरची काळजी यावर भर दिला जात आहे. बाल आरोग्य व लसीकरणांतर्गत १०० टक्के लसीकरण, नवजात बालकांची नियमित तपासणी आणि कुपोषण निर्मूलन मोहिमा राबवण्यात येत आहेत.
३० वर्षांवरील नागरिकांसाठी NCD Screening अंतर्गत मधुमेह व रक्तदाब तपासणी, स्तन व गर्भाशय मुख कॅन्सर स्क्रिनिंग तसेच जीवनशैलीत बदलासाठी मार्गदर्शन केले जात आहे. किशोरवयीन आरोग्यात अॅनिमिया नियंत्रण, मासिक पाळी स्वच्छता आणि मानसिक आरोग्य जागरूकता यावर भर दिला जात आहे. स्वच्छता व पोषण क्षेत्रात ODF स्थिती टिकवणे, सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करणे आणि संतुलित आहाराबाबत जनजागृती केली जात आहे.
अंमलबजावणीसाठी गावनिहाय Micro-planning, ASHA, ANM आणि AWW यांचे समन्वित काम, Monthly Village Health Day प्रभावीपणे राबवणे, डिजिटल नोंदणी व फॉलोअप प्रणाली मजबूत करणे आणि High-risk रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.
हे अभियान यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, महिला बचत गट, युवक मंडळे आणि प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. “आरोग्य ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे” ही भावना समाजात रुजवणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे अभियान महाराष्ट्राला केवळ आजारमुक्त नव्हे तर आरोग्यदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
निरोगी गाव – समृद्ध महाराष्ट्र | आज प्रतिबंध, उद्या सुरक्षित भविष्य! | रोग टाळा, आरोग्य वाढवा!
