मिरकरवाड्यात पडीक बोटीच्या केबीनमध्ये गांजा साठवणारा संशयित अटक
- by Yogesh Bandagale
- November 17, 2025
- 113 views
रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा परिसरातील पडीक बोटीच्या केबीनमध्ये विक्रीसाठी गांजा साठवणाऱ्या एकाला शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ३०० ग्रॅम वजनाचा, अंदाजे ₹१४,६०० किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव मोहन सिंग रामचंद्र भाट (वय २६, मूळ रा. नेपाळ; सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे आहे. या संदर्भात पोलिस हवालदार कुशल हातिसकर यांनी फिर्याद दिली.
शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस पथक १४ नोव्हेंबर रोजी मांडवी, पेठकिल्ला, मिरकरवाडा परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मलबार जेटीच्या बाजूला असलेल्या एका पडिक बोटीच्या केबीनमध्ये संशयित हा पाठीवर सॅक घेत संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्याची चौकशी व तपासणी केली असता सॅकमध्ये गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला.
यानंतर संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २०(ब)२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या कारवाईत पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, पीएसआय सागर शिंदे, पोलिस हवालदार अमोल भोसले, आशिष भालेकर, कुशल हातिसकर आणि रणजित जाधव यांनी सहभाग घेतला.
