१४९ वर्षांची परंपरा आणि नऊ वर्षांनंतरची निवडणूक
- by Yogesh Bandagale
- October 05, 2025
- 41 views
चिपळूण (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेली चिपळूण नगर परिषद यावर्षी आपल्या १४९व्या वर्षात पदार्पण करत आहे. ब्रिटिश काळात स्थापन झालेली ही नगर परिषद आता शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, याच काळात नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून आज सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.
चिपळूण नगर परिषदेची स्थापना सन १८७६ मध्ये ब्रिटिश सत्ताकाळात झाली. रंगनाथ बापूजी पत्की हे पहिले कार्यकारी नगराध्यक्ष (मुख्य कार्यकारी आयुक्त) होते. त्या काळात या संस्थेला ‘म्युनिसिपालिटी’ म्हणून मान्यता मिळाली होती. तेव्हापासून आजपर्यंत चिपळूण नगर परिषदेचा प्रवास हा विकास, संघर्ष आणि लोकसहभाग यांचा संगम म्हणून ओळखला जातो. गेल्या १४९ वर्षांच्या कालावधीत एकूण ३५ नगराध्यक्षांनी नगर परिषदेचे नेतृत्व केले असून आता ३६वा नगराध्यक्ष कोण ठरणार, याची उत्सुकता वाढली आहे. येत्या डिसेंबरपासून नगर परिषद शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात पाऊल ठेवणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोना संकटामुळे आणि प्रशासकीय अडचणींमुळे गेल्या नऊ वर्षांपासून झालेल्या नाहीत. यंदा नगर परिषदा, नगर पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका होत आहेत. आज मंत्रालयात नगराध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठी आरक्षण जाहीर होणार असून त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी राजकीय वातावरण तापलेले आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या इतिहासात यंदा तिसऱ्यांदा थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुरेखा खेरडे या थेट जनतेतून निवडून आल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ २७ डिसेंबर २०२१ रोजी संपला. त्यानंतर सुमारे तीन वर्षे नऊ महिने नगर परिषदेवर प्रशासक नियुक्त आहे. आता पुन्हा एकदा शहराला “प्रथम नागरिक” मिळणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. उषाताई लवेकर या पहिल्या थेट नगराध्यक्ष झाल्या होत्या, त्यानंतर २०१६ मध्ये सुरेखा खेरडे या दुसऱ्या थेट महिला नगराध्यक्ष झाल्या. आता नऊ वर्षानंतर पुन्हा थेट लोकनियुक्तीची निवडणूक होत असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या प्रवासात सहा महिलांनी सातवेळा नगराध्यक्षपद भूषवले आहे, तर २८ वेळा पुरुष नगराध्यक्ष झाले आहेत. १९९६ मध्ये हेमलता बुरटे, १९९७ मध्ये वृषाली कांबळी, २००१ मध्ये उषाताई लवेकर, २००६ मध्ये पुन्हा हेमलता बुरटे, २०११ मध्ये सावित्री होमकळस, २०१४ मध्ये रिहाना बिजले आणि २०१६ मध्ये सुरेखा खेरडे या महिला नगराध्यक्ष झाल्या. मागील वेळी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने यावेळी सर्वसाधारण पुरुष आरक्षण पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या महाराष्ट्रात दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन शिवसेना गट असल्याने चिपळूणमध्येही राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना अपेक्षित आहे. शरद पवार गट राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष रमेशभाई कदम इच्छुक असल्याची चर्चा आहे. शिंदे गट शिवसेनेकडून उमेश सकपाळ व सुधीर शिंदे, तर भाजपकडून विजय चितळे आणि शशिकांत मोदी यांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे अजित पवार गट राष्ट्रवादीकडून मिलिंद कापडी यांच्यासह काही इतर नावेही समोर येत आहेत. आरक्षण निश्चित झाल्यानंतर पक्षनिहाय उमेदवारीची चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.
नगर परिषदेबरोबरच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर ही ऐतिहासिक संस्था देखील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या दोन्ही संस्थांनी शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडीत मोलाचा वाटा उचलला आहे. नगर परिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शहराच्या विकासाचा पाया या संस्थांच्या कार्यातून घडत आला आहे.
नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण आज जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये चाचपणी सुरू आहे. कोणत्या वर्गासाठी हे पद राखीव राहील, यावरून उमेदवारांची नावे स्पष्ट होतील. त्यानंतरच प्रचाराचा वेग आणि गठबंधनाचे समीकरण ठरणार आहे. त्यामुळे चिपळूण शहरातील जनतेचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष आजच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.
