हँड्स-ऑन अपर लिंब कॅडॅव्हेरिक कार्यशाळा उत्साहात

खेड, ता. १३ : वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात नुकतेच हँड्स-ऑन अपर लिंब कॅडॅव्हेरिक वर्कशॉप २०२६ अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. ऑर्थोपेडिक्स, अ‍ॅनाटॉमी व रेडिओलॉजी विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय कार्यशाळेचा उद्देश सॉफ्ट एम्बाल्म्ड कॅडॅव्हरच्या साहाय्याने अपर लिंब शस्त्रक्रियात्मक पद्धतींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे हा होता.

कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यामध्ये डॉ. सुनील नाडकर्णी, डॉ. मानसींग घाटगे, डॉ. नेताजी पाटील तसेच डॉ. नंदन कानविंदे यांचा समावेश होता. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी कॅडॅव्हरवर आधारित प्रशिक्षणाचे शस्त्रक्रिया कौशल्य, अचूकता व रुग्ण सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यशाळेचे शैक्षणिक नेतृत्व डॉ. नंदन कानविंदे यांनी केले. ऑर्थोपेडिक्स विभागातून डॉ. प्रशांत कांबळे सहयोगी प्राध्यापक, डॉ. जतिन बडगुजर, सहयोगी प्राध्यापक, डॉ. अनिश पॉल, सहयोगी प्राध्यापक, तसेच अ‍ॅनाटॉमी विभागातून डॉ. प्रशांत मूल्या, प्राध्यापक (अ‍ॅनाटॉमी) यांनी सक्रिय सहभाग घेतला. नियोजनबद्ध सत्रांमध्ये हात, मनगट, फोरआर्म, कोपर, आर्म व शोल्डर या भागांवरील विविध शस्त्रक्रियात्मक अ‍ॅप्रोचेसचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक सत्रात प्राध्यापकांचे प्रात्यक्षिक व त्यानंतर प्रतिनिधींना विस्तृत हँड्स-ऑन डिसेक्शनची संधी देण्यात आली.

कार्यशाळेचे एक वैशिष्ट्य म्हणजे अ‍ॅनाटॉमी विभागाचा नाविन्यपूर्ण सहभाग. डॉ. प्रशांत मूल्या, डॉ. पुष्पा बुरुटे, डॉ.संतोषकुमार भिसे  यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र अ‍ॅनाटॉमी स्टेशन्स उभारण्यात आले, जिथे प्रशिक्षित प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांनी चार्ट्स व टॅब्लेटवरील 3D अ‍ॅनाटॉमी मॉडेल्सच्या साहाय्याने अपर लिंब अ‍ॅनाटॉमीचे सादरीकरण केले. यामुळे ऑर्थोपेडिक्स विभागातील प्रतिनिधींना शस्त्रक्रिया व अ‍ॅनाटॉमी यांचा तात्काळ व प्रत्यक्ष संबंध समजण्यास मोठी मदत झाली. तसेच पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी हे एक मौल्यवान अध्यापन-अनुभव ठरले.

महाराष्ट्र व गुजरात राज्यातील विविध भागांतून आलेल्या ऑर्थोपेडिक पदव्युत्तर विद्यार्थी, सीनियर रेसिडेंट्स व कन्सल्टंट्स यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. सॉफ्ट एम्बाल्म्ड कॅडॅव्हर्सची जीवनसदृश ऊतक गुणवत्ता, उत्तम जतन केलेले टिश्यू प्लेन्स व फॉर्मालिनच्या वासाचा अभाव याबाबत प्रतिनिधींनी विशेष समाधान व्यक्त केले. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे शिकण्याचा अनुभव अत्यंत प्रभावी ठरल्याचे सर्व प्रतिनिधींनी नमूद केले.

कार्यशाळेचा समारोप फीडबॅक व समारोप समारंभाने झाला. सहभागी प्रतिनिधींनी कार्यशाळेची शैक्षणिक गुणवत्ता, उत्कृष्ट नियोजन व अ‍ॅनाटॉमी - ऑर्थोपेडिक्स यांचा प्रभावी समन्वय याबद्दल प्रशंसा व्यक्त केली. हँड्स-ऑन अपर लिंब कॅडॅव्हेरिक वर्कशॉप २०२६ चे यशस्वी आयोजन हे बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रगत कॅडॅव्हर-आधारित शस्त्रक्रिया प्रशिक्षणातील नेतृत्व अधोरेखित करणारे ठरले.
 

संबंधित लेख