टीडब्ल्यूजे कंपनीची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू
- by Yogesh Bandagale
- September 30, 2025
- 228 views
चिपळूण : 'दाम दुप्पट' परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची करोडोंची फसवणूक केल्याच्या प्रकरणात टीडब्ल्यूजे (TWJ) कंपनी अडचणीत सापडली आहे. यवतमाळनंतर आता चिपळूणमध्येही गुन्हा दाखल झाल्याने कंपनीच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून (EOW) चिपळूण येथील टीडब्ल्यूजेच्या कार्यालयात सोमवारी तीन तास तपासणी करण्यात आली.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून टीडब्ल्यूजे कंपनीने 'दुप्पट रक्कम परतावा' या आमिषावर लोकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक उभी केली होती. प्रारंभी थोडाफार परतावा दिला गेला, मात्र नंतर व्याज देणे बंद झाले आणि गुंतवणूकदारांचे पैसे अडकले.
वाचनालय, दवाखाना आणि सामाजिक प्रकल्पांच्या नावाखाली उभारलेले उपक्रमही आता ठप्प अवस्थेत आहेत, कारण या प्रकल्पांतील कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने ते बंद पडले आहेत. कंपनीचे संचालक समीर नार्वेकर यांनी सिंगापूरमधील गुंतवणुकीतून पैसे परत मिळतील, असे वारंवार सांगून गुंतवणूकदारांना वेळोवेळी आश्वासने दिली. १५ ऑगस्टपर्यंत पैसे मिळतील, असे त्यांनी आधी म्हटले होते, त्यानंतर पुन्हा एका व्हिडिओद्वारे "लवकरच पैसे परत मिळतील," असे सांगण्यात आले. मात्र, आजवर कोणालाही पैसे मिळालेले नाहीत.
चिपळूणमधील गुहागर बायपास रोडवरील सुसज्ज कार्यालयही आता बंद असून, भाडे थकवल्यामुळे सोसायटीने ते कार्यालय ताब्यात घेतले आहे. गुंतवणूकदारांप्रमाणेच आता कंपनीच्याही अडचणी वाढल्या असून, गुंतवणुकीची रक्कम परत मिळेल की नाही, याबाबत साशंकता वाढत चालली आहे.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी गतीने सुरू असून, सोमवारी तीन तास चाललेल्या तपासणीत नेमके काय निष्पन्न झाले, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
संपूर्ण राज्यात ‘दामदुप्पट’ फॉर्म्युल्यावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असून, अशा योजनांकडे अधिक काळजीपूर्वक पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
