सोडये आणि बंधू समाज मंडळ, मुंबई यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मुंबई / लांजा : सोडये आणि बंधू समाज मंडळ, मुंबई (मूळ गाव – जावडे गाव, कातळवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ रविवारी दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील संत झेवियर्स कॉलेज, सी.एस.एम.टी. येथे उत्साहात पार पडले.

सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन गावप्रमुख व वाडी प्रमुख श्री. संजय कृष्ण सोडये, मुंबई कमिटीचे अध्यक्ष श्री. विलास नारायण सोडये, उपाध्यक्ष श्री. संतोष हरिश्चंद्र सोडये, सचिव श्री. राजाराम सखाराम भोवड, उपसचिव श्री. राकेश रमेश सोडये, खजिनदार श्री. रविंद्र विश्राम सोडये, उपखजिनदार श्री. दिपक गंगाराम रांबाडे तसेच सर्व कमिटी सदस्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

या स्नेहसंमेलनात इयत्ता पहिली ते दहावी, बारावी, डिप्लोमा व पदवी शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, विविध मनोरंजनात्मक खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण दिसून आले. ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला.

मुंबईत वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांना वर्षभरात एकमेकांना भेटण्याची संधी कमी मिळते. या पार्श्वभूमीवर सर्व गावकरी, महिला, युवक व विद्यार्थी एकत्र येऊन आपुलकीने विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन मिळते, तर महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रमामुळे महिलांमध्ये संवाद व एकोप्याची भावना अधिक दृढ होते.

कार्यक्रमास उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे उपस्थितांना गावाकडच्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी काही वक्त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व जीवनविषयक मार्गदर्शन करत उपस्थित बांधव, महिला व विद्यार्थी वर्गाला शुभेच्छा दिल्या.

 

संबंधित लेख