सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात ‘जागतिक हात धुवा दिन’
- by Yogesh Bandagale
- October 18, 2025
- 36 views
खेर्डी चिंचघरी (ता. चिपळूण) : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा, चिंचघरी (सती) येथे ‘जागतिक हात धुवा दिन’ मोठ्या उत्साहात आणि आरोग्यविषयक जागृतीसह साजरा करण्यात आला. “हात धुणे हा जंतू आणि संसर्गांपासून बचाव करण्याचा प्रभावी, परवडणारा आणि सोपा मार्ग आहे,” या संदेशावर आधारित उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेचे आणि निरोगी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या विशेष दिनानिमित्त शाळेच्या शिक्षिका राजेशिर्के मॅडम यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे वैज्ञानिक आणि आरोग्यदायी महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून हात धुण्याची योग्य पद्धत प्रत्यक्ष दाखवून घेण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ सर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात “स्वच्छता पाळू या, निरोगी राहूया” असा संदेश देत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे पालन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या शिक्षिका रूपाली खरात आणि शितल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, ज्येष्ठ शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील आणि स्वरा भुरण यांनी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढून “स्वच्छ हात, निरोगी उद्याचा पाया” हा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याचे समाधान शिक्षकवर्ग व पालकवर्गाने व्यक्त केले.
