कतार सीनियर वुमन्स क्रिकेट टीममध्ये चिपळूणची फातिमा मुकादम
- by Yogesh Bandagale
- February 14, 2026
- 107 views
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील गोवळकोट गावाशी नाळ जुळलेली फातिमा खालिद मुकादम हिने कतार सीनियर वुमन्स क्रिकेट टीमसाठी पदार्पणाचा सामना खेळत इतिहास रचला आहे. अवघ्या १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळवत तिने चिपळूणचे नाव उज्ज्वल केले आहे.
कॅप्टन खालिद अब्दुल वहाब मुकादम यांची कन्या असलेली फातिमा ही मध्यमगती गोलंदाज असून मधल्या फळीत फलंदाजीदेखील करते. तिच्या अष्टपैलू कामगिरीमुळे तिला कतारच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले.
फातिमाचे वडिलांचे मूळ गाव गोवळकोट (चिपळूण) असल्याने हा यशस्वी क्षण केवळ मुकादम कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण चिपळूण शहरासाठी अभिमानाचा ठरला आहे. लहान वयात मिळवलेले हे मोठे यश तिच्या उज्ज्वल क्रिकेट कारकिर्दीचे संकेत मानले जात आहेत.
फातिमाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल चिपळूणमधील सर्व स्तरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
