सावर्डे विद्यालयात सह्याद्रीच्या मातोश्रींच्या स्मृतींना उजाळा
- by Yogesh Bandagale
- January 04, 2026
- 298 views
स्व. अनुराधा निकम – शिक्षण चळवळीला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व : प्राचार्य राजेंद्र वारे
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे सह्याद्रीच्या मातोश्री स्व. अनुराधा निकम यांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी स्व. अनुराधाताई निकम यांच्या समाजसेवेचा व शिक्षणनिष्ठेचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
ते म्हणाले की, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत स्व. अनुराधाताईंचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून त्या इतर कर्मचाऱ्यांचे पगार, गरजू विद्यार्थ्यांचे भोजन, कपडालत्ता तसेच वह्यापुस्तकांसाठी सातत्याने मदत करत असत. निकम साहेबांप्रमाणेच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण चळवळीला वाहून घेतले. कोकणवासीयांचा शैक्षणिक विकास हेच त्यांचे अंतिम ध्येय होते, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते. दीपक भुवड व समृद्धी साळुंखे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कु. कृष्णाली खापरे हिने केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी कविता सादरीकरणातून आपल्या भावना व्यक्त केल्या. कु. कोमल पंडित हिने “श्रावणमास”, कु. प्रेरणा हुमणे हिने “माणूस”, तर कु. तनुश्री घाग व कु. निधी भडवळकर यांनी “ज्योत तेवते” ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थी मनोगतात दीप्ती लिबे हिने स्व. अनुराधाताईंच्या कार्यातून मिळणाऱ्या प्रेरणेचा उल्लेख केला.
यावेळी अनुराधाताई निकम यांच्या प्रेरणादायी जीवनपटावर आधारित चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कार्याची माहिती मिळून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली. तसेच वर्गसजावट स्पर्धेतील विजेत्या वर्गांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी भित्तिपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य राजेंद्रकुमार वारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कु. कृष्णाली खापरे हिने मानले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव रुजविणारा ठरला.
