शब्दांचे जादूगार शाहीर विकास लांबोरे आज चिपळुणात
- by Yogesh Bandagale
- October 03, 2025
- 202 views
चिपळूण, ३ ऑक्टोबर : चिपळूण तालुक्यातील मालघर गाव आज एका संस्मरणीय सांस्कृतिक सोहळ्याला साक्षी राहणार आहे. सुप्रसिद्ध शाहीर, कवी, गीतकार आणि "सप्तसुरांचा बादशहा" म्हणून ओळख असलेले शाहीर राजेश निकम आणि लोकप्रिय गाणी लिहिणारे, महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले शब्दांचे जादूगार शाहीर विकास लांबोरे यांच्यात कलगी-तुरा नाचांचा जंगी सामना रंगणार आहे.
या खास कार्यक्रमाचे आयोजन शिवबा मित्र मंडळ मालघर यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आले आहे. आज शुक्रवार, दिनांक ३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता मालघर येथे हा रंगतदार सामना रंगणार आहे.
शाहीर विकास लांबोरे यांच्या "ए आये काय काय आणू", "गणाला पोवतं बांधायचं" अशा गाण्यांनी राज्यभरात लोकप्रियता मिळवली आहे. अनेक वर्षांनी ते चिपळूणमध्ये सादरीकरण करणार असल्यामुळे स्थानिक रसिकांमध्ये विशेष उत्सुकता आहे. त्यांच्या भाषेतली ओढ, शब्दांची ताकद आणि सणासुदीला साजेसा रांगडा बाज पाहायला मिळणार असल्याची रसिकांमध्ये चर्चा आहे.
सप्तसुरांचा बादशहा अशी ओळख असलेले शक्तीवाले शाहीर राजेश निकम आणि शब्दांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे शाहीर विकास लांबोरे यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे.
दोन नामवंत शाहिरांच्या या शब्दयुद्धात नृत्य, ताल आणि ताकददार शब्दांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
