अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना मिळणाऱ्या धान्याच्या प्रमाणात बदल
- by Yogesh Bandagale
- December 05, 2025
- 117 views
रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत मिळणाऱ्या धान्याच्या मासिक नियतन प्रमाणात सरकारने बदल केला आहे. हा बदल जानेवारी 2026 पासून लागू होणार असून यानुसार अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थींना मिळणाऱ्या तांदूळ व गव्हाच्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे.
नवीन नियमानुसार, जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांना आता प्रती शिधापत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू असे वाटप केले जाणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थींना (PHH) प्रत्येक सदस्याला 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू इतके धान्य दिले जाईल.
दरम्यान, डिसेंबर 2025 पर्यंतचे धान्य वाटप मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. त्यानुसार अंत्योदय कार्डधारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू देण्यात येईल.
या बदलांची सर्व रास्त धान्य दुकानदारांनी तसेच लाभार्थींनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी केले आहे.
