मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांचे प्रशिक्षण सत्र
- by Yogesh Bandagale
- December 05, 2025
- 73 views
रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सहा महिन्यांच्या सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन तसेच सागरी इंजिन देखभाल व परिचालन या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 1 जानेवारी 2026 पासून रत्नागिरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सुरू होणार असून 29 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक युवकांनी प्रशिक्षण केंद्राशी थेट संपर्क साधावा किंवा मोबाईल/व्हॉट्सअॅप क्रमांक 9422371901 तसेच ई-मेल ftcrtn@gmail.com वर संवाद साधावा, अशी माहिती मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जी. द. सावंत यांनी दिली.
प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे, शैक्षणिक पात्रता किमान चौथी उत्तीर्ण, तसेच उमेदवार क्रियाशील मच्छिमार असणे आणि किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण शुल्क प्रतिमाह 450 रुपये, म्हणजे सहा महिन्यांसाठी एकूण 2,700 रुपये असेल. दारिद्र्यरेषेखालील उमेदवारांसाठी प्रतिमाह 100 रुपये, म्हणजे एकूण 600 रुपये शुल्क आकारले जाईल.
अर्जासोबत आधारकार्ड, रेशनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, तसेच दारिद्र्यरेषेखालील असल्यास संबंधित ग्रामसेवक/गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे. अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरून, संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस घेऊनच सादर करावा.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) योजनेअंतर्गत अर्थसहाय्य घेऊन मच्छिमारी नौका बांधण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच पात्रतेनुसार सागरी नौकांवर खलाशी म्हणून रोजगाराच्या संधीही प्राप्त होऊ शकतील.
