सहकाराचा सजग प्रहरी : बंधू संजयशेठ रेडीज

ऑक्टोबर महिन्याचा तो गुरुवार... ९ ऑक्टोबरची सकाळ एक दुःखद बातमी घेऊन आली. व्हॉट्सअॅप ग्रुपवर आलेला छोटासा मेसेज — “आताच संजयशेठ रेडीज गेल्याचे कळतंय…” — मन सुन्न करून गेला. खात्री करण्यासाठी चिपळूण अर्बन बँकेच्या लोटे शाखाधिकारी विलास वाजे साहेबांशी संपर्क साधला आणि त्यांच्या निराश स्वरात बातमी खरी असल्याचं स्पष्ट झालं. सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू, ज्ञानी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व — बंधू म्हणजेच संजयशेठ रेडीज — काळाच्या पडद्याआड गेले.

मन २५ वर्षे मागे गेले. १९९७ मध्ये मी लोटे औद्योगिक वसाहतीत एमआरएफ फ्रँचायसी मध्ये रुजू झालो. काही वर्षांनी नवीन घर बांधण्याचा विचार केला. अर्थपुरवठ्यासाठी चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा सभासद झालो. ५०,००० रुपयांच्या कर्जाची अपेक्षा होती, पण मंजुरी मिळाली फक्त १५,००० रुपयांची! बांधकाम सुरू असताना तो धक्का मोठा होता. तेव्हा कोणीतरी सुचवलं — “बंधूंना भेटून बघा.” मी थेट पेढीवर गेलो. प्रथमच त्यांची भेट झाली. त्यांनी एका अनोळखी माणसाची व्यथा संयमाने ऐकली. “तुमचा प्रस्ताव पाहून पुन्हा निर्णय घेऊ,” असं सांगितलं आणि पुढील मिटिंगला माझं कर्ज ५०,००० रुपयांपर्यंत वाढवलं. तो त्यांच्या माणूसपणाचा, ओळखण्याच्या आणि विश्वास ठेवण्याच्या स्वभावाचा खरा नमुना होता.

नंतर अनेक वेळा त्यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली. त्यांनी मला सहकाराचा गाभा शिकवला. ते नेहमी म्हणायचे — “आपण ज्या संस्थेत काम करतो, तिचा पोटनियम नेहमी वाचत राहा. ऑडिट रिपोर्ट काळजीपूर्वक समजून घ्या. अहवालांची देवाणघेवाण करा आणि ज्या सहकारी संस्थांचे आपण सभासद आहोत, त्यांच्या वार्षिक सभेला कधीही गैरहजर राहू नका.” ही त्यांची सहकाराची चतुरसूत्री आजही माझ्या आयुष्यात मार्गदर्शक ठरते.

मी शिरळ गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत संचालक होतो. त्या वेळी सोसायटीत संगणकीकरणाचा उपक्रम सुरू करताना संजयशेठ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. माझ्या निवेदनानंतर त्यांनी कौतुकाचे शब्द उच्चारले — तो क्षण आजही आठवणींमध्ये कोरला आहे. नंतरच्या टर्ममध्ये चेअरमन झाल्यावर पुन्हा त्यांना विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी निमंत्रित केले. काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत, पण सकाळी सातला स्वतः फोन करून “नाना, काम चालू ठेवा” असं सांगणं, हीच त्यांच्या बांधिलकीची खूण होती.

बंधूंशी अधिक जवळीक आली ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या काळात. मी त्यांचा सूचक होतो. फॉर्म दाखल करण्यापासून ते प्रचारापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत राहिलो. त्यांच्या विजयात माझा खारीचा वाटा असावा, हीच माझ्यासाठी मोठी समाधानाची गोष्ट आहे.

बंधू काँग्रेस विचारसरणीचे होते आणि ज्योतिबा फुले यांचे निस्सीम भक्त. चिपळूण नगर परिषदेत नगरसेवक म्हणून त्यांनी अनेक कामं केली. प्रसारमाध्यमांपासून नेहमी चार हात दूर राहिले. त्यांचा वाढदिवस कधी असतो, हे लोकांना कळायचंही नाही. “ड्रायव्हर ठेवा” असा सल्ला देणाऱ्यांनाही ते हसत उत्तर द्यायचे — “मी स्वतःच चालवतो.” पंपावर जाऊन सीएनजी नोझल स्वतः लावण्याची त्यांची सवय त्यांच्या साधेपणाचा पुरावा होती.

बंधू… तुमच्या आठवणी आजही मनात दरवळत आहेत. सहकार, माणुसकी, आणि प्रामाणिकतेचा वारसा तुम्ही मागे ठेवला आहे. तुमच्या आत्म्यास शांती लाभो… संपदा मॅडम आणि इशा ताईंना हे दुःख पचविण्याची ताकद लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

तुमच्या स्मृतींचा सुवास दरवळत राहील,
बंधू — तुम्ही नसाल तरी तुमचं अस्तित्व उमटत राहील…

— श्री. सुनिल (नाना) टेरवकर, 
मालघर – चिपळूण
 

संबंधित लेख