सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच
- by Yogesh Bandagale
- January 01, 2026
- 50 views
चाफे सजाचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात
रत्नागिरी : खरेदी केलेल्या जागेच्या सातबारा उताऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी तालुक्यातील चाफे सजाचा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडला. ही कारवाई गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी चाफे येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली.
बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५१, सध्या रा. ओम शांती अपार्टमेंट, नाचणे, रत्नागिरी; मूळ रा. कोणेगाव, ता. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी मौजे आगरनरळ (ता. व जि. रत्नागिरी) येथे १० गुंठे बिनशेती जागा खरेदी केली होती. या जागेचा फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी त्यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी चाफे येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, हे काम करून नाव लागलेला सातबारा उतारा व फेरफाराची प्रत देण्यासाठी तलाठी बजरंग चव्हाण याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली.
या प्रकरणी तक्रारदाराने ३१ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १ जानेवारी २०२६ रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, तलाठी चव्हाण याने लाच मागितल्याचे व ती स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर एसीबीच्या पथकाने चाफे येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी बजरंग चव्हाण याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, सुहास शिंदे व उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहायक पोलीस फौजदार उदय चांदणे, पोलीस हवालदार दीपक आंबेकर, श्रेया विचारे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, समिता क्षीरसागर व वैशाली धनवडे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी एसीबीच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
