चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भाजी मंडईला नवे जीवन
- by Yogesh Bandagale
- January 14, 2026
- 449 views
चिपळूण : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली भाजी मंडईची इमारत ही शहराचे हृदय असून गेली जवळपास वीस वर्षे उभारूनही विनावापर उभी आहे. शासकीय नियमानुसार ही इमारत पाडता येणार नसून ती कार्यान्वित करणे आवश्यक आहे. भाजी व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीचे गाळे व जशी रचना अपेक्षित आहे, त्या पद्धतीने सध्याच्या इमारतीत आवश्यक बदल केले जातील आणि भाजी मंडई सुरू करण्यासाठी माझे व नगर परिषद प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिली.
भाजी मंडई सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे भाजी व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भरत गांगण, दत्तात्रय वाळुंज, श्री. माजलेकर, बापू शिंदे, स्वाती खेडेकर यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना भरत गांगण यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या कामाचा धडाका आपल्याला भावल्याचे सांगून पालिकेला हरहुन्नरी नगराध्यक्ष लाभल्याची भावना व्यक्त केली. मंडईची डागडुजी करणे अत्यंत आवश्यक असून यापूर्वी दिलेल्या आराखड्यानुसार काम झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, असेही त्यांनी नमूद केले. अन्य व्यापाऱ्यांनीही या वेळी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.
यानंतर नगराध्यक्षांनी सर्व भाजी व्यापाऱ्यांसह थेट भाजी मंडईच्या इमारतीची पाहणी केली. या ठिकाणी एकूण ४३ गाळे असून पुरेशी वायुवीजन व्यवस्था नाही. माल उतरवण्याची योग्य सोय, बाजारपेठेतील मुख्य रस्ता म्हणजेच गुहागर एस.टी. स्टँडच्या बाजूने प्रवेशद्वार असावे, अशा विविध सूचना व्यापाऱ्यांनी मांडल्या. व्यापाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांनुसार संबंधित विभागांना अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या.
लवकरच आवश्यक कामे पूर्ण करून भाजी मंडई सुरू करण्यात येईल, असा विश्वास नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केला.
यानंतर माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या घरासमोर सुरू असलेल्या फळभाजी मार्केटचीही नगराध्यक्षांनी भाजी व्यापाऱ्यांसह पाहणी केली. या ठिकाणीही आवश्यक ते बदल करण्यात येतील. चुकीच्या पद्धतीने फळभाजी मार्केटची उभारणी करण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पाटण येथील भाजी मंडई व्यापाऱ्यांसह पाहणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या वेळी नगरसेवक कपिल शिर्के, निहार कोवळे, उदय जुवळे शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, बांधकाम विभागाचे अभियंता श्री. महेश डफळ, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, सुजित जाधव, उपमुख्य अधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, रवी सातपुते यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
