रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी शिंदे गटाच्या पाच महिला इच्छुक
- by Yogesh Bandagale
- October 21, 2025
- 65 views
रत्नागिरी : रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून पाच महिला इच्छुकांच्या नावावर चर्चा सुरू असून, याबाबत आज पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्व इच्छुक महिलांची बैठक घेतली.
या बैठकीत शिल्पा सुर्वे (जिल्हाप्रमुख), वैभवी खेडेकर, स्मितल पावसकर, ऍड. श्वेता मयेकर आणि ऍड. पूजा शेट्ये या पाच महिला उपस्थित होत्या. नगराध्यक्षपदासाठी या पाचही महिलांनी स्वारस्य दाखवले असून, त्यांच्यात चुरस रंगण्याची चिन्हे आहेत.
बैठकीदरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की,“नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल, हे ठरविण्याचा निर्णय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. ते ज्या उमेदवारावर विश्वास ठेवतील, त्या उमेदवाराच्या पाठिशी सर्वांनी एकजुटीने काम करावे.”
सामंत यांनी सर्व इच्छुकांना आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू ठेवण्याचे आणि पक्षशिस्त पाळण्याचे निर्देश दिले.
रत्नागिरी शहरातील शिवसेना (शिंदे गट) मजबूत संघटन म्हणून ओळखली जाते. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. मात्र, उदय सामंत यांच्या हस्तक्षेपानंतर आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याने सर्वांची नजर त्यांच्या घोषणेवर आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, “पाच महिलांपैकी कोणास नगराध्यक्षपदाची संधी मिळणार?” हा प्रश्न आता रत्नागिरीतील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
