चिपळूण तालुक्यातील दुर्गम वाड्यांमध्ये आता सौर ऊर्जेच्या स्ट्रीट लाईट्सचा प्रकाश

चिपळूण, दि. ४ : डोंगराळ आणि दुर्गम भागात राहणाऱ्या धनगर, भोई, गवळी समाजासाठी दिलासादायक बातमी! आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत ₹१ कोटींचा निधी सौर ऊर्जा स्ट्रीट लाईट्ससाठी मंजूर करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत कोंडमळा धनगरवाडी, कोसबी धनगरवाडी, वेहेळे भोजनेवाडी, डेरवण धनगरवाडी, सावर्डे धनगरवाडी, पोफळी एनाचे तळे, करजवाडा (१ व २), तळसर शेवरीचा दंड, कोळकेवाडी (जांभरई/वाडसाडी), मालदोली भोईवाडी, भिले भोईवाडी या वाड्यांमध्ये सौर पथदीप बसवले जाणार आहेत.

या भागांतील नागरिकांना आतापर्यंत अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे म्हणजे धाडसाचे काम होते. रस्त्यांवर प्रकाशाचा अभाव, महिलांची आणि वृद्धांची सुरक्षिततेची चिंता, तसेच वन्यप्राण्यांचा सततचा धोका – अशी भयावह परिस्थिती होती. पण आता हे दृश्य बदलणार आहे.

सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या पथदीपांमुळे नागरिकांना रात्रीच्या वेळेस सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे, तसेच वीज बिलाचा कोणताही खर्च होणार नाही. पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-बचतीचा हा प्रकल्प गावकऱ्यांसाठी एक मोठी सोय ठरणार आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, “अनेक वर्षांपासून आम्ही या सुविधेची वाट पाहत होतो. आमदार शेखर निकम यांनी आमच्या अडचणी ओळखून प्रत्यक्ष कृती केली. आता आमच्या वाड्यांत खरोखरच दिवसासारखा प्रकाश येईल.”

 

संबंधित लेख