श्रीराम महोत्सव अंतरंग; आनंदराव पवार महाविद्यालयात बक्षीस वितरण
- by Yogesh Bandagale
- December 24, 2025
- 135 views
चिपळूण (प्रतिनिधी) : श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री आनंदराव पवार महाविद्यालयात दिनांक २४ डिसेंबर रोजी श्रीराम महोत्सव अंतरंग अंतर्गत बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता, कर्तुत्व आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. उद्घाटन महत्त्वपूर्ण पाहुण्यांच्या हस्ते झाले, ज्यात महाविद्यालयाच्या कॉलेज कमिटीचे चेअरमन श्री मल्लेश लकेश्री सर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयात फूड स्टॉलचे आयोजन देखील करण्यात आले होते, जिथे विद्यार्थ्यांनी विविध स्वादिष्ट पदार्थ तयार करून सादर केले, आणि उपस्थितांनी त्याचा आस्वाद घेतला.
बक्षीस वितरण समारंभात क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व अभिमान स्पष्ट दिसत होता.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये संस्थेचे संचालक श्री विजय गो. बागवे, कॉलेज कमिटीचे चेअरमन श्री मल्लेश लकेश्री सर, परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊ कांबळे सर, शिक्षक वृंद, पी.आर.ओ. चोगले सर, रजिस्टार खेडेकर सर, प्राचार्या अरुणा सोमण, विद्यार्थी आणि इतर कर्मचारी यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कौशल्य व सर्जनशीलता वाढवण्याची संधी मिळाली आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले.
