सती चिंचघरीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रमातून शाळेत फुलवली परसबाग
- by Yogesh Bandagale
- January 04, 2026
- 54 views
चिपळूण : प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी सती, ता. चिपळूण हे विद्यालय उपक्रमशील शाळा म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांच्या मेहनत, चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर शाळेच्या आवारात सुंदर अशी परसबाग फुलविण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा परसबाग उपक्रम राबविण्यात आला.
या परसबागेत विद्यार्थ्यांनी टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, मेथी, पालक, मुळा, कोबी, कांदापात, झेंडूची फुले तसेच विविध औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. बी पेरणीपासून रोपांची निगा, पाणी देणे, तण काढणे आणि सेंद्रिय खत देणे अशी सर्व कामे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने केली. परसबागेस ठिबक सिंचनाची सुविधा देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे फळ म्हणून परसबागेत भरघोस भाजीपाला तयार झाला. विशेष म्हणजे, या परसबागेतून मिळालेल्या ताज्या व पोषक भाज्यांचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. स्वतः पिकवलेल्या भाज्यांचा स्वाद घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान स्पष्टपणे दिसून येत होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, पर्यावरणाविषयी जाणीव, सेंद्रिय शेतीचे महत्त्व तसेच आरोग्यदायी आहाराची आवड निर्माण झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका रूपाली खरात व शितल पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत ही परसबाग यशस्वीपणे फुलवली.
