तिहेरी हत्याकांडातील सहआरोपी दर्शन पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू
- by Yogesh Bandagale
- October 03, 2025
- 175 views
रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडामुळे जिल्हा हादरला होता. या प्रकरणात आता आणखी एक महत्वाची घडामोड घडली असून मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचा बाप दर्शन शांताराम पाटील (वय 57) याचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जयगड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या प्रकरणात दर्शन पाटीलवर भारतीय न्याय संहिता कलम 302, 201, 109 सह 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगा दुर्वास पाटीलला खून करण्यास प्रवृत्त करणे आणि गुन्ह्याची माहिती दडपल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. सिताराम वीर याच्या खूनप्रकरणी त्याला अटक झाली होती.
अटकेनंतर त्याची तब्येत बिघडल्याने प्रथम रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर नंतर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. तो 'मल्टिपल ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम'ने ग्रस्त असल्याने अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने 23 सप्टेंबर रोजी त्याला 50 हजारांच्या वैयक्तिक जामिनावर व तितक्याच रकमेच्या हमीवर सशर्त सुटका दिली होती.
मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी दर्शन पाटीलचा मृत्यू झाला. या तिहेरी हत्याकांड प्रकरणात एकूण चार आरोपींवर गुन्हे दाखल झाले असून, दर्शन पाटीलचा मृत्यू झाल्याने आता तीन आरोपी अद्याप पोलिस कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी करीत आहेत.
