मंडणगडचे डॉ. विकास शेट्ये यांना कै. अण्णासाहेब शिरगावकर स्मृती पुरस्कार जाहीर
- by Yogesh Bandagale
- December 20, 2025
- 35 views
मंडणगड : दापोली तालुका कोकणस्थ वैश्य समाज, दापोली यांच्या वतीने दिला जाणारा कै. अण्णासाहेब शिरगावकर स्मृती पुरस्कार मंडणगडचे सुपुत्र, वैश्य समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विकास मधुसूदन शेट्ये यांना जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे अधिकृत पत्र संस्थेचे अध्यक्ष श्रीराम गणपत मजलेकर यांनी डॉ. शेट्ये यांना दिले आहे.
वैश्य समाजाला इतर मागासवर्ग (OBC) पुनःस्थापन मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच जिल्हाध्यक्ष या नात्याने वैश्य समाज एकत्रित ठेवण्यासाठी त्यांनी केलेले संघटनात्मक कार्य याची दखल घेऊन यंदाच्या कै. अण्णासाहेब शिरगावकर स्मृती पुरस्कारासाठी डॉ. विकास शेट्ये यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
हा पुरस्कार रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता दापोली येथील हॉटेल वृंदावन सभागृहात होणाऱ्या दापोली तालुका कोकणस्थ वैश्य समाजाच्या सर्वसाधारण सभेत प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीराम मजलेकर यांनी दिली.
दरम्यान, या पुरस्काराच्या घोषणेनंतर डॉ. विकास शेट्ये यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सामाजिक, शैक्षणिक व वैश्य समाजातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
