श्रीराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूणचा वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू
- by Yogesh Bandagale
- January 14, 2026
- 117 views
चिपळूण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण अंतर्गत परांजपे मोतीवाले हायस्कूल व श्री. आनंदराव पवार महाविद्यालय, चिपळूण यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात सुरू झाला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी, राष्ट्रीय कबड्डीपटू, तसेच माजी उपनगराध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव उर्फ बाळा कदम यांच्या शुभहस्ते पार पडले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना बाळा कदम यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. अभ्यासाबरोबरच खेळातही प्राविण्य मिळवावे, असे आवाहन करत त्यांनी खेळाडूंना शासकीय व खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ व माजी अध्यक्ष कै. बापूसाहेब खेडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या क्रीडा महोत्सवात खो-खो, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, डॉजबॉल आदी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात विविध खेळांमध्ये राज्यस्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंनी क्रीडाज्योत आणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
गेल्या दोन वर्षांत श्रीराम एज्युकेशन स्पोर्ट्स अकॅडमीचे सुमारे १७ खेळाडू खो-खोच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले असून, यावेळी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत देवळेकर यांनी संस्थेच्या क्रीडाविषयक वाटचालीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
या उद्घाटन समारंभास संस्थेचे कार्याध्यक्ष राजन खेडेकर, सचिव मल्लेश लकेश्री, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, संचालक सुहास चव्हाण, विलास चिपळूणकर, राजू विखारे, तसेच शिक्षक व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
