चतुरंगचा ‘सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार’ विद्याभारतीच्या मेघन गणपत्येला
- by Yogesh Bandagale
- December 17, 2025
- 118 views
चिपळूण : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार’ यंदा विद्याभारतीच्या कु. मेघन अश्विनी तेजानंद गणपत्ये याला जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे हे २५ वे वर्ष आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधील निवडक २४५ विद्यार्थ्यांमधून ३६ विद्यार्थ्यांची यावर्षी या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेघन हा गुरुकुलमधील गुणवंत विद्यार्थी असून त्याच्यातील बहुविध कलागुण आणि मनमिळावू स्वभाव ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. त्याने चित्रकलेच्या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवले आहेत. तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या तबल्याच्या पहिल्या दोन्ही परीक्षांमध्ये त्याने उत्तम श्रेणी मिळवली आहे. मेघन उत्तम पेटीवादकही आहे.
मेघनला पाचवी व आठवीत शिष्यवृत्ती मिळाली असून होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत त्याने यश संपादन केले आहे. याशिवाय जिल्हास्तरीय मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धेत त्याने पाचवा क्रमांक मिळवला आहे. अभ्यासासोबत विविध कलाप्रकारांतील उल्लेखनीय कामगिरी आणि प्रत्यक्ष मुलाखतीतील प्रभावी सादरीकरणाच्या आधारे त्याची ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या यशाबद्दल संस्था अध्यक्ष एअर मार्शल (नि.) हेमंत भागवत, कार्यवाह छायाताई मुसळे, शालेय समितीचे चेअरमन चंद्रकांत सावर्डेकर, प्रकल्प समन्वयक प्रसाद सनगरे, गुरुकुल प्रबंधक मोहन भिडे, मुख्याध्यापिका जान्हवी टाकळे, मार्गदर्शक शिक्षक सुश्रुत चितळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेघनचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
