श्री. विभाकर वाचासिद्ध सर… व्यवस्थापनाचे महामेरू
- by Yogesh Bandagale
- January 30, 2026
- 500 views
परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या अलोरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तसेच चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक माननीय श्री. विभाकर वाचासिद्ध सर हे शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय कार्याचा घेतलेला हा मागोवा.
शैक्षणिक प्रशासनातील नेतृत्वावर मोठ्या प्रमाणावर संशोधन केलेल्या फीडलर यांच्या मते मुख्याध्यापकाच्या कार्यपद्धतीची दोन प्रमुख अंगे असतात—
१) शालेय कार्यपद्धतीचा सुनिश्चित आकृतीबंध
२) सहकाऱ्यांशी असलेले विश्वासाचे व आदराचे नाते
शाळेची प्रणाली सुसंगतपणे मार्गी लावण्यासाठी ज्याच्यावर संपूर्ण शाळेचे भवितव्य अवलंबून असते, असा आदर्श मुख्याध्यापक म्हणजे उत्तम नेतृत्व व दूरदृष्टी असलेला, संघटनचातुर्य, निर्णयकुशलता व व्यवस्थापनाचे अद्ययावत ज्ञान असणारा प्रशासक; नियोजनातील योजकता साधणारा आणि “यथा चित्तं तथा वाचो, यथा वाचस्तथा क्रियाः” या उक्तीप्रमाणे ज्यांच्या विचारांशी त्यांची कृती पूर्णतः सुसंगत असते, असे हे व्यक्तिमत्त्व म्हणजेच शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक माननीय श्री. विभाकर वाचासिद्ध सर. त्यांना सादर प्रणाम.
मनुष्यस्वभावाची अचूक पारख करून कोणत्या कामासाठी कोणाची योजना करावी, हे कल्पकतेने ठरविणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा शिक्षण क्षेत्रातील परशुराम एज्युकेशन सोसायटीमधील प्रवास २ जुलै १९९२ रोजी सुरू झाला. साधारणतः २००९ पर्यंत सरांची सेवा सकाळ सत्रात होती. सन २००९ मध्ये दहावी इयत्ता दुपार सत्रात गेल्यानंतर सरांचा दुपार सत्रात प्रवेश झाला.
२०१२ मध्ये तत्कालीन कार्याध्यक्षांच्या सहकार्याने शाळेची छात्रबोधिनी उभारण्यात सरांचा सिंहाचा वाटा होता. २०१५ मध्ये प्रथमच विद्यार्थ्यांची महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे सहल आयोजित करण्यात आली. संस्थेच्या इतिहासात प्रथमच राज्याबाहेरची सहल भारताची राजधानी दिल्ली येथे २०१७ मध्ये—आत्ताचे परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व तेव्हाचे एअरमार्शल मा. श्री. हेमंतजी भागवत साहेब यांच्या अपूर्व सहकार्याने—सफल झाली. त्या अनुभवांवर आधारित “वेध दिल्लीचा” हे पुस्तक शालेय सहलीच्या संदर्भाने प्रथमच पालकांच्या उपस्थितीत उत्साहात प्रकाशित झाले.
“योजकस्तत्र दुर्लभः” या उक्तीची प्रचिती देणारा एक महत्त्वाचा प्रसंग संस्थेच्या इतिहासात घडला. सेवाशर्तीच्या उत्तरार्धात, आपल्या नोकरीपेशाचे रौप्यमहोत्सवी सेवावर्ष मनातल्या मनात साजरे करत, संस्थेच्या अत्युच्च वैचारिक निष्ठेनुसार एक स्थित्यंतर घडले. परिवर्तन साध्य करण्यासाठी सरांना नोव्हेंबर २०१७ मध्ये अलोरे येथे रुजू व्हावे लागले.
अलोरे शाळेच्या इमारतीच्या भाडेपट्टीचा प्रश्न सरांनी “वाचासिद्ध पॅटर्न” या स्वतःच्या कार्यपद्धतीने पूर्णत्वास नेला. प्रशासकीय कामे हाताळण्यात सरांचा हातखंडा असून, त्याचाच एक भाग म्हणून पुढील ३० वर्षांसाठीचा निश्चित करार दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला. जून २०२० मध्ये मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या चार वर्षांत—निवृत्तीला केवळ ११ महिने शिल्लक असताना—हा अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सफाईदारपणे मार्गी लावण्यात आला.
सैन्यातील “Not to question why” या तत्त्वाप्रमाणे तसेच “प्रारब्धं मुत्तमजना न परित्यजन्ति” हे वचन सूत्रधार मानून, हाच वाचासिद्ध पॅटर्न अलोरे शाळेतील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या अनुकंपा नियुक्त्यांच्या बाबतीतही यशस्वी ठरला. तसेच अलोरे येथे अटल लॅब, सायन्स शाखेची मान्यता आणि सुसज्ज ग्रंथालय उभारण्याची योजना राबविण्यात आली. सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार सरांची राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण समितीवर शासनातर्फे नेमणूक झाली असून, ते राज्य अभ्यासक्रम शैक्षणिक संशोधन मंडळाचे सदस्य आहेत. हा संस्थेसाठी आणि शाळेसाठी सार्थ अभिमानाचा विषय आहे.
समाजनेतृत्वाच्या दृष्टीने पाहिले तर गावाचे सामाजिक व सांस्कृतिक नेतृत्व मोठ्या प्रमाणावर मुख्याध्यापकावर अवलंबून असते. “शाळा समाजापर्यंत पोहोचली पाहिजे आणि समाज शाळेपर्यंत” या सूत्रानुसार सरांनी अल्पावधीत अनेक समाजाभिमुख उपक्रमांची प्रभावी आखणी केली. अवघ्या सहा महिन्यांत वसुबारसेच्या दिवशी निवृत्त शिक्षकांसाठी आयोजित गोवत्स द्वादशी कार्यक्रम, एक राखी देशासाठी हा उपक्रम, स्वातंत्र्यदिनी क्रांतिकारकांच्या वेशभूषेसह वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण, दहावीच्या परीक्षेसाठी ३५ हून अधिक पालकांनी उत्साहाने केलेले पर्यवेक्षण, तसेच स्नेहसंमेलनाचे Facebook Live—हे सर्व उपक्रम समाजाभिमुख ठरले.
या सर्व कार्यांची पुण्याई म्हणून संस्थेच्या इतिहासातील एका ऐतिहासिक दिवशी—२६ जानेवारी २०२६ रोजी—ध्वजवंदनाचा मान सरांना लाभावा, ही जणू दैवाची ललाटरेषाच म्हणावी लागेल.
ठळक उदाहरण द्यायचे झाले तर, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या २८ नगरसेवकांपैकी १४ नगरसेवक हे सरांचे विद्यार्थी आहेत. तसेच चिपळूण नगरपालिकेसोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात जुनी संस्था असलेल्या माधवबागेतील हिंदू विद्यार्थी वसतिगृह न्यासाचे सर गेली २५ वर्षे कार्यकारी विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या सेवानिवृत्तीचे औचित्य साधून सामाजिक जाणीवेचे भान राखत, गीतरामायणाच्या मंगलमय वातावरणात शाळेच्या सक्रिय सहभागाचे ‘सारथ्य’ सरांनी अत्यंत कौशल्याने जपले. संस्कार व संस्कृतीच्या या वळणावर युनायटेडच्या गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी अग्रदूताची भूमिका बजावली. सामाजिक क्षितिजावर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली.
असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या माननीय श्री. विभाकर वाचासिद्ध सरांनी निवृत्तीनंतरही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहावे, या सदिच्छेसह विनम्र अभिवादन. तसेच सरकारी पाशातून सेवा पुस्तिकेतील दायित्वावरून मुक्त झाल्यानंतर निवृत्तीच्या उत्तरार्धात आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना…
— सौ. वैशाली चितळे
युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण
