वन विभागाच्या ‘फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉल’चे आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन
- by Yogesh Bandagale
- October 04, 2025
- 126 views
चिपळूण : कोकणाच्या एका बाजूला सह्याद्रीची भव्य रांग आणि दुसऱ्या बाजूला निसर्गरम्य समुद्रकिनारा — या निसर्गवैभवाच्या भूमीत आता पर्यटन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने एक नवा उपक्रम साकारला आहे. वन विभागाच्या चिपळूण कार्यालयात जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत बांधण्यात आलेल्या ‘फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉल’चे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली, सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष विश्वास (भाऊ) काटदरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाला प्रांताधिकारी आकाश लिगाडे, विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, मुख्याधिकारी विशाल भोसले, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष शहानवाज शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार शेखर निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “या फोटो गॅलरीत देशी झाडे, प्राणी आणि पक्ष्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात यावी. यामुळे नव्या पिढीत निसर्गाबद्दल प्रेम आणि जिज्ञासा निर्माण होईल. केवळ झाडे लावून उपयोग नाही, तर त्यांचे योग्य संगोपन झाले पाहिजे. देशी झाडांच्या लागवडीवर भर दिल्यास निसर्गाचा समतोल राखला जाईल.”
ते पुढे म्हणाले, “महिन्यातून किमान एकदा विद्यार्थी आणि नागरिकांसाठी निसर्गाशी संबंधित व्याख्यानमाला आयोजित केली गेल्यास हा प्रकल्प खऱ्या अर्थाने जिवंत राहील. तालुक्यातील सरपंचांची सभा घेऊन वन विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली पाहिजे.”
कोकणालाही ताडोबासारखी समृद्ध निसर्गसंपदा लाभली असल्याचे सांगून आमदार निकम म्हणाले, “प्राणी-पक्ष्यांचे दर्शन इथेही होते, पण त्याची योग्य प्रसिद्धी न झाल्याने ते दुर्लक्षित राहते. ती प्रसिद्धी झाल्यास नक्कीच पर्यटन वाढेल. बांबू लागवडीवर भर दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. वन विभागाने खैर नर्सरीप्रमाणे बांबू नर्सरी सुरू केल्यास मोठा फायदा होईल.”
प्रांताधिकारी आकाश लिगाडे म्हणाले, “कोकणाला पर्यटन म्हणून अजून व्यापक प्रसिद्धी मिळालेली नाही. लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याची गरज आहे. विदर्भात जशी बौद्ध पौर्णिमेला प्राणी गणना केली जाते, तशीच गणना येथेही केल्यास कोकणातील प्राणी-पक्ष्यांचा सविस्तर आकडा मिळेल.”
कार्यक्रमात विश्वास काटदरे, शहानवाज शहा यांनीही मनोगत व्यक्त केले, तर विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी प्रास्ताविक करून गॅलरीविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाला पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम, बापू काणे, माजी सभापती बाळशेठ जाधव, ग्लोबल टुरिझमचे अध्यक्ष रामशेठ रेडीज, माजी सभापती रसिका देवळेकर, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांनी केले.
