कोकणचा निसर्ग जपा; सकारात्मक साहित्यनिर्मितीची गरज – उदय सामंत

चिपळूण/प्रतिनिधी : विपुल निसर्गसंपदेने नटलेल्या कोकणात सारं काही आहे. मात्र त्याचं सादरीकरण आपणच आपल्या पद्धतीने विविध स्तरावर केलं पाहिजे. विशेषतः साहित्यिकांनी कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखाण करायला हवे. कोकणच्या तुलनेत कॅलिफोर्निया केवळ दहा टक्के आहे. कोकण म्हणजे निसर्ग आहे, तर कॅलिफोर्निया म्हणजे कृत्रिमता. त्यामुळे कोकणातील निसर्ग टिकवूया, असे आवाहन मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी केले.
डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील मांडकी पालवण येथे आयोजित राज्यातील पहिल्या ग्रामीण कृषी, सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कोकण सुपुत्रांचा सन्मान; मराठी भाषेचा जागतिक विस्तार
मंत्री सामंत पुढे म्हणाले की, बॅरिस्टर नाथ पै यांनी आखलेल्या मार्गावरूनच आपला प्रवास सुरू आहे. कोकण रेल्वेचे निर्माते मधू दंडवते यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला, तर चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव रत्नागिरीतील उपकेंद्राला देण्यात आले आहे. अशा प्रकारे कोकणच्या सुपुत्रांचा सन्मान आपण आपल्या पद्धतीने केला आहे.
यावर्षी विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत असून, कुसुमाग्रजांचे हे गाव आहे. जगभरातील मराठी भाषिकांनी येथे यावे, हा या संमेलनामागचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
मातृभाषा टिकवण्यासाठी संमेलनांची आवश्यकता
सीमाभागातील मराठी ग्रंथालयांना शासनाने अनुदान दिल्यामुळे अनेक वाचनालये उभी राहत असल्याचे सांगत सामंत म्हणाले की, मातृभाषा टिकवण्यासाठी अशा साहित्य संमेलनांची नितांत गरज आहे. मात्र ही संमेलनं केवळ चर्चेपुरती न राहता, शासनाला मार्गदर्शन करणारी ठरली पाहिजेत.
साहित्य संमेलनांमध्ये अनेकदा राजकारण्यांवर टीका केली जाते. मात्र राजकारणातही कलाकारांची काही कमी नाही. काही राजकारणी तर चोवीस तास मेकअप लावूनच वावरतात, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

दहा आदर्श गावांची निवड; पोपटराव पवारांचे मार्गदर्शन अपेक्षित
पद्मश्री पोपटराव पवार यांना उद्देशून बोलताना सामंत म्हणाले की, ज्या पद्धतीने पोपटराव पवार यांनी गावांचा विकास केला, त्याच धर्तीवर जिल्ह्यातील पाच मतदारसंघांतील प्रत्येकी दोन, अशी एकूण दहा गावे आदर्श गावांसाठी निवडण्यात येतील. या गावांना पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कृषी विद्यापीठे संशोधनाची केंद्रे बनावीत
कोकण कृषी विद्यापीठाबाबत बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, कृषी विद्यापीठे ही संशोधनाची केंद्रे बनली पाहिजेत. येथून शास्त्रज्ञ घडले पाहिजेत, जे शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदत करतील. लागलेली किड त्याच वर्षी नष्ट झाली पाहिजे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
कृषी विद्यापीठांमध्ये सुमारे २५ हजार एकर जमीन पडीक असून, तिचा संशोधनासाठी वापर व्हायला हवा. मराठी भाषा ही जगातील प्रगत भाषा असून, महाराष्ट्रात केवळ मराठीचीच सक्ती राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकारात्मक साहित्यनिर्मितीवर भर – डॉ. तानाजीराव चोरगे
संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले की, शासनाच्या सहकार्यामुळे राज्यातील पहिले ग्रामीण साहित्य संमेलन येथे आयोजित करता आले. साहित्यिकांनी नेहमी सकारात्मकता मांडली पाहिजे. भाषा आणि समाजा-समाजात वाद व विद्वेष निर्माण होईल, असे लिखाण टाळावे. बोलीभाषा टिकवण्यासाठी आणि मराठी अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनीच योगदान देणे आवश्यक आहे.

ग्रामीण लिखाणात शेती व संशोधनाचा अभाव – डॉ. संजय भावे
स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. संजय भावे म्हणाले की, जगात शेती आणि शिक्षण हीच शाश्वत क्षेत्रे आहेत. मात्र अलीकडच्या ग्रामीण लिखाणात शेती, संशोधन व शेतकऱ्यांच्या समस्या पुरेशा प्रमाणात येत नाहीत. त्यामुळे साहित्यिकांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

पुस्तक व स्मरणिकेचे प्रकाशन
या निमित्ताने डॉ. तानाजी चोरगे लिखित ‘आंदोलन’ या पुस्तकाचे तसेच संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन संजय शुस्कुटे यांनी केले, तर आभार अरुण इंगवले यांनी मानले.

कार्यक्रमाला पद्मश्री पोपटराव पवार, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिल्पा सुर्वे, समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, बाबाजी जाधव, जयवंत जालगांवकर, अजय चव्हाण, सागर देशपांडे, डॉ. राजन गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख